
फलटण येथील संस्थानकालीन पुरातन श्रीराम मंदिरात परंपरेनुसार रामजन्मोत्सव व रामनवमी कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी नाईक निंबाळकर राजघराण्यातील सदस्यांची आणि भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती.
स्थैर्य, फलटण, दि. 27 मार्च : फलटण येथील संस्थानकालीन पुरातन आणि ऐतिहासिक श्रीराम मंदिरात गुरुवारी (दि. २६) परंपरेनुसार रामजन्मोत्सव व रामनवमीचा कार्यक्रम अत्यंत धार्मिक वातावरणात, मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. मुधोजी मनमोहन राजवाड्याशेजारी असलेल्या या मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त दर्शनासाठी फलटण शहर व पंचक्रोशीसह तालुक्यातून आलेल्या आबालवृद्ध भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
२५२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा:
श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी १७७४ ते १७९४ या कालावधीत, त्या संस्थानाच्या गादीवर असताना सुमारे २५२ वर्षांपूर्वी या भव्य मंदिराची उभारणी केली होती. त्या काळापासून येथे प्रतिवर्षी रामनवमी, श्रीराम रथोत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम परंपरागत पद्धतीने साजरे केले जातात. मंदिरात गुढीपाडव्यापासून दररोज सायंकाळी सलग नऊ दिवस ह.भ.प. सतीश महाराज खोंमणे (बारामती) यांचे रामायणावरील प्रवचन आणि रामनवमी दिवशी रामजन्माचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.
राजघराण्यातील सदस्यांची उपस्थिती व पारंपरिक विधी:
या उत्सवासाठी नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टचे पदाधिकारी आणि राजघराण्यातील श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत यशोधराराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. वसुंधराराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अजयसिंहराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रामनवमी उत्सवानिमित्त मानकरी वेळणकर कुटुंबातील शुभम अतुल वेळणकर व मान्यवरांनी मुधोजी मनमोहन राजवाड्यातील राजघराण्याच्या देवघरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती आणून मंदिरात प्रभू श्रीराम व सीतामातेला भेटविली. त्यानंतर श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत सौ. शिवांजलीराजे यांनी ही मूर्ती श्रीमंत सत्यजितराजे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी ती फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवली. उपस्थित महिलांनी रामजन्माचा पाळणा म्हटला. प्रभू श्रीराम जन्मानंतर ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. प्रभू श्रीराम-सीतामातेच्या जयघोषात हा सोहळा उत्साहात पार पडला.
राजघराण्याच्या देवघरातून आणलेल्या प्रभू श्रीरामाची मूर्ती तेथे उपस्थित असलेल्या राजघराण्यातील महिलांनी भक्तिभावाने आपल्या ओटीत घेतली व मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी साकडे घातले. यावेळी परंपरागत पुजारी अलगुडे निकम परिवारापैकी शामराव अलगुडे निकम उपस्थित होते.
मंदिराची मनमोहक सजावट:
यानिमित्त प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्तींना आकर्षक वेषभूषा करण्यात आली होती. संपूर्ण सागवानी आणि उत्तम नक्षीकाम केलेल्या श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा व मखमली पडदे लावून नयनरम्य सुशोभीकरण करण्यात आले होते. मंदिर व परिसरात मंडप उभारण्यात आला होता. दर्शनानंतर भाविकांना सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले.
चोख पोलीस बंदोबस्त व सुविधा:
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने मंदिराकडे येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रतिबंध करून उत्तम नियंत्रण ठेवले. गर्दी असूनही भाविकांना शिस्तीत दर्शन घेता आले. फलटण नगरपरिषद आणि नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी व इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मंदिराबाहेर विविध विक्रेत्यांनी पूजेचे साहित्य, फुले आणि मिठाईचे स्टॉल लावले होते.
इतर ठिकाणीही रामनवमीचा उत्साह:
दरम्यान, फलटण शहरातील शुक्रवार पेठेतील (बारसकर गल्ली) पुरातन बालाजी मंदिर, वेळणकर दत्त मंदिर, भगते दत्त मंदिर आणि बारसकर चौकातील हनुमान मंदिरातही रामनवमी उत्सव परंपरागत पद्धतीने साजरा झाला. यामध्ये प्रामुख्याने मारवाडी समाज आणि स्थानिक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याशिवाय, ग्रामीण भागातील आसू, तरडगाव, गोखळी, सोमंथळी, साखरवाडी, गिरवी, आदर्की आदी गावांमध्येही रामनवमीनिमित्त भजन, कीर्तन, नामजप असे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
