दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । आटपाडी । उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल, भारताचे माजी केंद्रीय मंत्री आणि जनसंघ व भारतीय जनता पक्ष या दोन राजकीय पक्षांच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावणारे श्री. रामभाऊ नाईक. जन्म सांगलीतला. जडणघडण आटपाडीतील असली तरी त्यांची कर्मभूमी नेहमीच मुंबई राहिली. सर्वसामान्य मुंबईकरांचे जीवन मरणाचे प्रश्न मांडणारे एक नेते म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन छेडणारे नेते म्हणून राज्यात त्यांची ख्याती आहे. विधानसभा आणि लोकसभा मतदार संघ भाजप सारख्या पक्षाच्या व्यक्तीने बांधणे ही ज्या काळात खुप अवघड गोष्ट होती, त्याकाळात ते मुंबई सारख्या शहरातून सातत्याने आमदार, खासदार म्हणून निवडून आले. १९५१ साली स्थापन झालेल्या भारतीय जनसंघाला श्री. रामभाऊ नाईक, वामनराव परब, गजानन भोर, बबनराव कुलकर्णी, जयवंतीबेन मेहता आणि हशु अडवाणी अशा मुंबईकर नेतृत्वाने आकार दिला. इतर नेत्यांच्या मानाने रामभाऊ नाईक यांनी संघटनेवर भर देत आपल्या चिकाटी, सातत्य, वक्तशीरपणा आणि नीटनेटकेपणाच्या जोरावर जनसंघाला जनमानसात स्थान मिळवून दिले. आणीबाणीसारखे संकट उभे राहीले असताना अतिशय धीरोदात्तपणे आणि शांतपणे तोंड देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सत्याग्रह करून पकडले जाण्यापेक्षा भुमिगत राहून पक्षाचे काम पुढे नेण्याचे आणि त्याचवेळी आणीबाणी विरोधात जनमत तयार करण्याचे काम त्यांनी चोखपणे बजावले. इतर सर्व लोक ज्यावेळी मुंबई शहराला बॉम्बे किंवा बंबई म्हणत तेव्हा रामभाऊ नाईक आग्रहाने मुंबई असाच उल्लेख करत. त्यांच्यामुळेच भारत सरकारने बॉम्बे, बंबई ऐवजी मुंबई म्हणण्याचा अधिकृत निर्णय घेतला. उत्तम संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी मुंबईत केवळ जनसंघ आणि भाजपचेच महत्व निर्माण केले असे नव्हे तर सर्वसामान्य माणसांना आपल्या प्रश्नांवर आवाज उठविणारे कोणीतरी आहेत असा विश्वास त्यांना देऊन बळ दिले.
कर्मयोद्धा जनप्रतिनिधी
१९७८ साली सर्व सामान्य मुंबईकरांनी त्यांना विधानसभेत पाठवले. १९७८ ते २००४ या काळात त्यांनी विधानसभा आणि लोकसभेत मुंबईचे नेतृत्व केले. चांगल्या पगाराची नोकरी सोडून राजकारणात उतरण्याचे धाडस करणारे, स्थानिक भूमीपुत्रांच्या प्रश्नावर आवाज उठविणारे, मध्यमवर्गीय मुंबईकरांच्या उपनगरीय रेल्वे आणि अन्य प्रश्नांसाठी झटणारे रामभाऊ, कोळी, मासेमार, भंडारी समाजाच्या आंदोलनाचेही नेते बनले. बोरीवली आणि उत्तर मुंबई या भागातून ३ वेळा विधानसभा आणि ५ वेळा लोकसभा जिंकणारे त्यांचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे. मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरातील, स्वातंत्र्याच्या ५५ वर्षानंतर सुद्धा मालाड सारख्या उपनगरात धारवली नावाचे आदिवासी गांव वीजेपासून वंचित आहे, हे त्यांनी जगाला दाखवून देणारे आणि त्या गावात वीज पोहचवारे रामभाऊ नाईक आहेत. मनोरी सारख्या भागात प्यायला पाणी नव्हते. या गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राखालुन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा चमत्कार त्यांनी करून दाखवला. मुंबईचे रेल्वे प्रवासी आणि रामभाऊ नाईक हे अतुट नाते. त्यांच्यासाठी ते प्रदीर्घ काळ लढत राहीले. पण जेव्हा अटलबिहारी वाजपेयी मंत्रीमंडळात रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी खास मुंबईसाठी रेल्वे विकास प्राधीकरण स्थापन केले. गेल्या २५ वर्षात मुंबई शहर आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीत ज्या सुधारणा झाल्या त्याचा पाया या प्राधीकरणाने रचला आणि आजची भक्कम रेल्वे सेवा उभी केली. महिलांसाठी स्पेशल ट्रेन हा त्यांचा जगासाठी आगळावेगळा निर्णय म्हणावा लागेल. त्यांच्या या एका प्रयत्नाने मुंबईतील नोकरदार महिला, त्यांची कौटुंबिक जबाबदारी सांभाळून घरातून बाहेर पडु शकतात आणि रात्री वेळेत सुरक्षितपणे आपल्या कुटुंबात परतु शकतात. या कार्याचे महत्व काही काळ मुंबईत राहीलेल्यांनाच समजू शकते.
लोकसभेत वंदेमातरम् म्हटले पाहीजे हा आग्रह रामभाऊंच्या पुढाकारानेच प्रत्यक्षात आला. आज देशभरातल्या खासदारांना जो खासदार निधी मिळतो, तो मिळाला रामभाऊ नाईक यांच्या आग्रही प्रयत्नांमुळेच. भारताच्या खोल समुद्रात परदेशी बोटींना, मच्छीमारीचा केंद्र सरकारने दिलेला परवाना रद्द करण्यासाठी देशातील मच्छिमारांचे रामभाऊंनी नेतृत्व केले. आणि रामभाऊंनी तो लढा यशस्वी करून दाखविला. मच्छिमारांचे असंख्य प्रश्न त्यांनीच सोडविले. पावसाळ्यात समुद्राकाठची उध्वस्त होणारी मच्छिमारांची घरे वाचविण्यासाठी भारत पेट्रोलियमचा निधी वापरून त्यांनी समुद्राला बांध घातला. मुंबईतल्या कुष्ठरुग्णांना अनुदान वाढवून देण्यापासून त्यांच्या घरकुलापर्यतचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. ६० रुपयापासून २००० रुपया पर्यतचे मानधन वाढवून मिळण्यासाठी ३० वर्षे सातत्याने ते कुष्ठरुग्णांसाठी कार्य करीत आहेत . या कार्यासाठी युनोचे दुत योही सासाकोवा (जपान) यांनी त्यांचे खास कार्यक्रमात कौतुक केले. या आणि अशा अनेक कार्यामुळे राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होताच पण सत्ता कोणाचीच असली तरी शब्द रामभाऊंचाच चालतो हे सर्वसामान्य, गरीब, झोपडपट्टीतील माणसांपासून, व्यापारी, उद्योगपती, नोकरदार, अधिकारी अशा सर्वांना पक्के माहीत असायचे. त्यामुळे हा सर्व वर्ग आजही रामभाऊंशी जोडला गेलेला आहे.
वसई, पालघर, विरार, बोरीवली या भागाशी रामभाऊंचे नाव कायमचे जोडलेले आहे. तारापूर अणु उर्जा प्रकल्पात पीडितांचे पुनर्वसन होण्यासाठी पंतप्रधानांच्या विरोधातील आंदोलनातही ते उतरले. ७२ तास उपोषण आणि मुंबई उच्च न्यायालयात, प्रकल्पग्रस्तांना घरे मिळावीत म्हणून दाखल केस मध्ये स्वतः उतरून त्यांनी निष्णात वकीलांप्रमाणे युक्तीवाद स्वतः केला होता. विरार डहाणू शटल रेल्वे ही एक ऐतिहासीक गोष्ट आहे. रामभाऊ नाईक यांच्या अविरत प्रयत्नामुळे २ सप्टेंबर १९९२ साली प्रा.मधु दंडवते यांनी पहिल्या विरार – डहाणू शटल रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला होता. त्या गाडीला आज ही “राम नाईक शटल” असेच लोक म्हणतात. ६ वर्षाने रामभाऊ नाईक स्वतः रेल्वेमंत्री झाले आणि या शटलच्या फेऱ्या त्यांनी प्रचंड संख्येने वाढविल्या. ज्यामुळे स्थानिक भुमीपुत्रांचे अनेक प्रश्न निकालात निघाले. केंद्रीय मंत्री असूनही पोलीस बंदोबस्त नाकारणारे, पहिल्या दोन विधानसभा निवडणुका चक्क स्कुटर वरून फिरून प्रचार करणारे रामभाऊ नाईक २००२ साली केंद्रीयमंत्री असताना, पालघरवर पुराचे संकट ओढवले. अतिवृष्टीमुळे पालघर तालुक्यात हाहाकार माजला. पश्चिम रेल्वे मार्गातील पालघर बोईसर पुल पुरामुळे वाहुन गेला. त्यामुळे मुंबई ते गुजरात आणि थेट दिल्ली ते जम्मु पर्यतची रेल्वे ठप्प झाली. तेथे पोहोचणे मुश्कील असताना रामभाऊ, पुल दुरुस्तीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या मालगाडीतून प्रवास करीत कामाला गती देण्यास कर्मचाऱ्यांना उद्युक्त – प्रोत्साहित केले. पाण्याने वेढलेले आगवण हे गाव दत्तक घेऊन त्या गावाचे पुनर्वसन केले. संकाटाच्या दुसऱ्या दिवशी संसार उपयोगी साहित्यासह मालगाडीतून आलेला केंद्रीय मंत्री, मालगाडीतून येवून चिखल तुडवीत लोकांच्या पर्यत पोहोचलेला मंत्री म्हणून लोकांच्या कायम लक्षात राहीला आहे. देशाचे पेट्रोलियम मंत्री असताना त्यांनी केलेल्या अनेक कार्याचा गौरव झाला. त्यातील एक म्हणजे अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ज्यांनी कारावास भोगला त्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीपित्यर्थ २४ तास प्रज्वलीत ज्योत त्यांनी अंदमानात उभी केली. भारत सरकार कडून अशा प्रकारची ही पहिलीच मानवंदना होती. मुंबई सारख्या शहरात पाईपने गॅस पुरवठा करणे हे मोठे आव्हान होते. पण रामभाऊंच्या कार्यकालात पाईपने गॅस पोहाचला. तो त्यांच्या नियोजनबद्ध कार्यकुशतेमुळेच. देशभक्तीची भावना केवळ बोलून नव्हे तर ती प्रत्यक्षात कृतीत दिसली. सध्या मुंबई महानगर क्षेत्रात १९ लाख कुटुंबांना पाईपद्वारा घरात गॅस दिला जातो. असा आग्रह धरणारे रामभाऊ, आयुष्यभर आपल्या कृतीतून देशभक्तीचे दर्शन घडवत आले. १९९९ साली कारगील युद्धात ४३९ भारतीय जवान आणि अधिकारी शहीद झाले. तेव्हा शहिदांना संपूर्ण देशाने वंदन केले पण रामभाऊंनी पेट्रोलियम मंत्रालयामार्फत एक आगळा वेगळा निर्णय घेतला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पेट्रोल आणि गैस एजन्सी देवून त्यांना आर्थिक आधार देण्याचे काम त्यांनी केले. त्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाबरोबर आणखी तीन – चार कुटुंबांनाही मदत झाली.
कर्करोगाशी चिवट सामना
आयुष्याच्या साठीत आले असताना रामभाऊ नाईक यांना कर्करोगाने गाठले. आता हा सामना कोण जिंकणार याची चिंता रामभाऊंच्या हजारो चाहत्यांना लागली होती. पण आटपाडीच्या सूर्योपासना मंदिरात बलोपासना केलेल्या रामभाऊंनी लाखो माणसांच्या सदिच्छा, आशीर्वादाच्या बळावर, मोठ्या आत्मविश्वासाच्या जोरावर कॅन्सरशी असलेली झुंज जिंकली आणि नव्या जोमाने ते या समाज कार्यात सक्रीय झाले. हे अदभूत होते.
आटपाडीच्या वेशीवर नागनाथआण्णा आणि रामभाऊंचा सामना
क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक पुजनीय व्यक्तीमत्व. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावलेले आण्णा स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्यांच्या हितासाठी झटू लागले. आपल्या भागात त्यांनी सहकारातून समृद्धी आणली. पण दुष्काळी जनता, धरणग्रस्त आणि उस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी लढा हा त्यांचे जिवितकार्य बनला होता. २००३ साली केंद्र सरकारने साखरेला निर्यात बंदी लावली. पाकिस्तानातून साखर आयात केली आणि साखर कारखान्यांना इन्कमटॅक्स लागु केला. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचा दर म्हणून दिलेली अधिकची रक्कम हा लाभांश ठरवून कारखान्यांना केंद्राकडून नोटीसा आल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या आण्णांनी केंद्राच्या सर्वच मंत्र्यांना जिल्हाबंदी जाहीर केली. त्यामुळे आटपाडीच्या दौर्यावर येत असलेल्या केंद्रीय मंत्री रामभाऊ नाईक यांचा आणि नागनाथआण्णांचा सामना होणार हे स्पष्ट झाले. पण सर्वसामान्यांसाठी झटणारे दोन वेगवेगळ्या मार्गांचे दिग्गज समोरासमोर येवू नये असे समाजातील अनेकांना वाटत होते. त्यादृष्टीने आटपाडीतील पत्रकारांच्यावर नागनाथआण्णांशी बोलण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रशासनामार्फत डी.वाय. एस. पी. श्री . शेख शासनामार्फत माजी मंत्री आण्णासाहेब डांगे तर आण्णांच्या बाजूने पत्रकारांनी शिष्टाई सुरु केली. हजारोंचा जनसमुदाय घेऊन नागनाथआण्णा आटपाडीच्या हेलीपॅडवर उभे होते. प्रसंग बाका होता. मात्र रामभाऊ नाईक यांची भूमिका समजून घ्यावी असे मी, (पत्रकार सादिक खाटीक), पत्रकार शाम देशपांडे, पत्रकार कुमारसिंह राजेभोसले, पत्रकार चैतन्य पैठणकर, पत्रकार सतिश भिंगे यांनी आण्णांना सुचविले. त्यानुसार हेलीपॅडवरच लालदिव्याच्या गाडीवरच रामभाऊ नाईक आणि नागनाथआण्णा नायकवडी उभे राहीले. आणि शेतकरी जनतेच्या भावना पंतप्रधानांपर्यत पोहोचवून मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर उपाय काढण्याचे आश्वासन रामभाऊंनी दिले. आणि या आंदोलनाची सुफळ सांगता झाली. मोठ्या मनाने वागलेले नागनाथआण्णा आणि धीरोदात्तपणे प्रेमाने आंदोलनाला सामोरे गेलेले रामभाऊ, या दोघांचेही जनतेत कौतुक झाले.
रामभाऊ नाईक यांच्याबद्दल आटपाडीकर म्हणून पुर्वीपासूनच मला आदर आहे. या घटनेनंतर त्यांच्याशी संपर्क होत गेला. गोमेवाडीत टेलीफोन एक्स्चेंज व्हावे म्हणून ते मंत्री असताना मी पत्रव्यवहार केला होता. केवळ पत्राची दखल घेऊन गोमेवाडीला एक्स्चेंज मिळवून दिले. या कामासाठी माजी मंत्री श्री. जयंतराव पाटील, माजी मंत्री कै. आर. आर. आबा पाटील यांचे ही प्रयत्न सत्कारणी लागले. ते लखनौला असताना कामाच्या अनुषंगाने दोन तीन वेळा फोन वरून बोलणे झाले. कामातच राम मानणारे असे हे व्यक्तीमत्व आहे . याची मनोमन खात्री पटली.
स्मारकांचा प्रश्न!
डॉ. शंकरराव खरात यांची जन्मशताब्दी साजरी करताना त्यांचे आटपाडीत स्मारक व्हावे अशी आग्रही भूमिका आहेच . पण त्याचवेळी आटपाडीतील अनेक रत्नांची स्मारके झाली नाहीत ही खंतही आहे. ग. दि. माडगुळकर, शंकरराव खरात, व्यंकटेशतात्या माडगुळकर, ना.सं. इनामदार, औंधचे राजे भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बॅरिस्टर आप्पासाहेब पंत, म.गो. तथा बाबा पाठक, प्रा. अरुण कांबळे या सर्वांच्या स्मारकासाठी एक समुह स्मारक आटपाडीत उभे करणे आवश्यक आहे. ज्यामुळे पुढच्या पिढीला त्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल. राज्य आणि केंद्र सरकार पातळीवर आटपाडीकरांची भूमिका कोणीतरी मांडणे गरजेचे आहे. रामभाऊ नाईक यांना आम्ही विनंती करतो की, हा स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा.
आटपाडीच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण होवू दे!
आटपाडी तालुका अनेक बाबतीत वंचित राहिला आहे. कराड – विटा – आटपाडी मार्गे पंढरपूर आणि बारामती – माळशिरस – आटपाडी – जत मार्गे विजयपूर (विजापूर) असे दोन नवे रेल्वे मार्ग जोडता येणे शक्य आहे. प्रचंड अडचणीतला कोकण रेल्वे प्रकल्प मार्गी लागत असेल तर आटपाडीचे रेल्वेचे स्वप्न फार अवघड नाही. आटपाडीच्या डाळींबांनी जगाची बाजारपेठ पादाक्रांत केली आहे. कृष्णेच्या भागात आलेल्या पाण्याने सर्व भागात विविध प्रकारची सर्वोत्तम फळे, सर्व प्रकारचा भाजीपाला यांचे प्रचंड उत्पादन होणार आहे. आटपाडीच्या बाजूने रामभाऊंनी प्रयत्न केल्यास आटपाडीचे रेल्वेबाबतचे नशीब पालटू शकते. केंद्र आणि राज्य त्यांच्या पक्षाकडेच असल्याने स्मारक आणि रेल्वेचा प्रश्न निकाली निघायला अडचण येणार नाही. माणदेश त्यांच्याकडे आस लावून बसला आहे.
रामभाऊ नाईक हे महाराष्ट्रातील राजकीय क्षितिजावर चमकदार कामगिरी केलेले एक धृव आहेत. अढळपदी विराजमान झाले, कोणी त्यांची जागा घेऊ शकले नाही हा अभिमान असला तरी लोक सेवेला ईश्वरसेवा मानणारे असे लोकसेवक पुढेही घडणे आवश्यक आहे. कोणतीही प्रबोधिनी असे लोकसेवक घडवू शकत नाही. त्यासाठी स्वत:च्या अंत:प्रेरणाच जागृत हव्यात. त्या जागृत होतील अशी पिढी पुन्हा निपजावी हीच प्रार्थना!