
दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । कोल्हापूर । कोल्हापूर येथील अवनी संस्थेच्या वतीने बाल कामगार प्रथा विरोधी दिन व सामाजिक न्याय दिनानिमित्त साताऱ्यात राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान रॅली काढण्यात आली.
अवनीच्या संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निघालेल्या रॅलीत तीनशे बालके, कचरा वेचक महिला व यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय व सुलोचना देवी साळुंखे हायस्कूलच्या विद्यार्थीनी या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. बालमजुरी थांबवा देश वाचवा या फलकांनी सातारकरांचे लक्ष वेधले. राजपथ ते पोवई नाका या दरम्यान असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. संस्थेच्या बाल अधिकार मंचच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले. साताऱ्यातील बाल कामगारांचा सर्वे व्हावा, सदर आस्थापनांवर तातडीच्या कारवाया करून संबधितांवर गुन्हे दाखल करावे, औद्योगिक वसाहतीतून बाल कामगारांची मुक्तता व्हावी, प्रत्येक पोलीस स्टेशनला बाल कल्याण पोलिस अधिकारी असावी, शालाबाह्य मुले शिक्षण प्रवाहात सामावून घ्यावीत. वाईतील कातकरी वस्तीतील मुलांना व्यसनापासून दूर ठेवावे. सातारा जिल्हा बाल कामगार मुक्त करावा, अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. शिवकिरण पेटकर, राधिका लोखंडे, महेश मोहिते, अमर कांबळे वनिता कांबळे, जैनुदिन पन्हाळकर, संगीता झोंबाडे, संगीता खुडे व इत्यादी सदस्य या रॅलीत उपस्थित होते.