भाऊरायासाठीची राखी वेळेत पोहोचणार! टपाल विभागाची विशेष सुविधा, फलटणमध्येही सोय


दैनिक स्थैर्य । दि. 04 ऑगस्ट 2025 । फलटण । बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनासाठी लाडक्या भावाला वेळेवर राखी पोहोचावी, यासाठी भारतीय टपाल विभागाने कंबर कसली आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त फलटणसह सातारा जिल्ह्यातील प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये राख्या स्वीकारण्यासाठी आणि त्या जलद गतीने वितरित करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी असलेल्या भावांपर्यंत राखी सुरक्षित पोहोचावी, यासाठी हजारो बहिणी टपाल सेवेचा आधार घेतात. ही गरज ओळखून टपाल विभागाने यावर्षी विशेष नियोजन केले आहे. राख्या पाठवण्यासाठी केवळ १७ रुपयांमध्ये आकर्षक, रंगीबिरंगी आणि सुरक्षित पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत. फलटण येथील टपाल कार्यालयात ही पाकिटे खरेदी करण्यासाठी व राख्या पाठवण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

राख्यांची पाकिटे इतर टपालात मिसळू नयेत आणि त्यांचे वितरण लवकर व्हावे, यासाठी टपाल कार्यालयांमध्ये स्वतंत्र पत्र पेट्या (लेटर बॉक्स) किंवा ट्रे ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी आपली राखी पाकिटे त्यातच टाकावीत किंवा थेट टपाल कर्मचाऱ्यांकडे द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक जलद सेवेसाठी ‘स्पीड पोस्ट’चा पर्याय वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

फलटण व्यतिरिक्त सातारा मुख्य कार्यालय, सातारा शहर, एमआयडीसी, संगमनगर, वाई, कोरेगाव, लोणंद, महाबळेश्वर आणि पाचगणी येथील टपाल कार्यालयांतही ही विशेष सुविधा उपलब्ध आहे.

टपाल विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाकिटावर ज्यांना राखी पाठवायची आहे, त्यांचे नाव, अचूक पत्ता, पिनकोड आणि मोबाईल क्रमांक स्पष्ट अक्षरात लिहावा. यामुळे राखी वेळेत आणि योग्य ठिकाणी पोहोचण्यास मोठी मदत होईल. काही अडचण आल्यास कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असेही वरिष्ठ अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!