
शौर्य फाउंडेशनतर्फे लोणावळा येथे आयोजित ‘महाराष्ट्र स्टेट योगासन चॅम्पियनशिप’मध्ये फलटणच्या ‘राजयोग फिटनेस स्टुडिओ’च्या सात खेळाडूंनी योगशिक्षिका वृषाली गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पदकांची कमाई करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 13 मार्च : शौर्य फाउंडेशन महाराष्ट्र (लोणावळा) यांच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टेट योगासन चॅम्पियनशिप’ स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील ‘राजयोग फिटनेस स्टुडिओ’च्या सात खेळाडूंनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. योगशिक्षिका वृषाली गांधी यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या या सातही योगसाधकांनी विविध गटांत पदकांची कमाई करत फलटण शहर व सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
खेळाडूंची सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची लयलूट
या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध वयोगटांत फलटणच्या खेळाडूंनी अत्यंत चमकदार कामगिरी केली. यामध्ये ८ वर्षांखालील (U8) गटात शिवांश खटके याने उत्कृष्ट योगासने सादर करत सुवर्णपदक पटकावले. १२ वर्षांखालील (U12) गटात वृंदा पिसे हिने, तर ३० वर्षांखालील (U30) गटात शिवानी कांबळे हिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. तसेच ८ वर्षांखालील गटात रुत्वी नाळे आणि कैवल्य जाधव यांनी कांस्यपदक, तर जिणेशा गांधी हिने चतुर्थ क्रमांकासह कांस्यपदक मिळवले. याशिवाय २३ वर्षांखालील (U23) गटात श्रावणी घनवट हिनेही कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रतिष्ठेची स्पर्धा अन् मान्यवरांची उपस्थिती
लोणावळ्यातील ॲड. बापूसाहेब भोंडे स्कूल येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून २०० हून अधिक योगसाधकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन शौर्य फाउंडेशनचे संस्थापक तेजस शिरसाठ, मंजुषा मराठे आणि अध्यक्ष अनिरुद्ध रहाणे यांनी केले होते. याप्रसंगी लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे, उपनगराध्यक्ष देवीदास भाऊ कडू, नगरसेविका सोनालीताई मराठे यांच्यासह लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा व शिवदुर्ग स्पोर्ट्सचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. या स्पर्धेचे अत्यंत निष्पक्ष परीक्षण घोडके सर, चाली राजा सर, अश्विनी काळे, सुलभा फटांगरे, अमोल म्हस्के, अलका जाधव, कदम सर, वृषाली गांधी आणि आकांक्षा शिवाळे यांच्या तज्ज्ञ परीक्षण समितीने केले.
विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव
स्पर्धेत सहभागी झालेल्या सातही योगसाधकांनी पदके प्राप्त केल्याबद्दल ‘राजयोग फिटनेस स्टुडिओ’च्या संचालिका वृषाली गांधी आणि या सर्व यशस्वी खेळाडूंवर सध्या फलटण शहर व परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच, ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शौर्य फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या या शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून संयोजकांचे विशेष आभार मानले जात आहेत.

