आटपाडीशी ” हार्ट टु हार्ट” जोडलेला राजु…. संपादक राजीव खांडेकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । आटपाडीशी । राजीव खांडेकर संपादक एबीपी माझा हे नाव आता देश परदेशात मराठी जिथे बोलली आणि पाहिली जाते तिथेपर्यत पोहचले आहे . अर्थात आमच्या आटपाडीचा आमचा राजू आता जगभर पोहचला आहे . संपादक राजीव खांडेकर या नावामागे एक वलय निर्माण झाले आहे . बालपणी आटपाडीत असतानाही त्याच्या मागे वलय होतेच . दोन्ही वलये त्याने स्वतः कष्टपूर्वक निर्माण केली आहेत . माणसांशी *हार्ट टु हार्ट* जोडलेले असणे त्याने आटपाडीत साध्य केले . १९७४ – ७५ च्या सुमारास चौथी पाचवीला असताना तो आटपाडीला आला . वडिल पोस्ट मास्तर . त्यामुळे आटपाडी त्याची भुमी बनली . तो ज्या भागात रहायचा तो सगळा आटपाडीच्या राजारामबापू हायस्कुलच्या मास्तर लोकांच्या राहण्याचा भाग . तसे मध्यमवर्गीय आणि आटपाडीतील अभिजन ठरतील अशा वर्गात तो वावरला असता तर ते चुकीचेही ठरले नसते . पण त्याच्या बोलक्या, चौकस पाण्यासारख्या स्वच्छ, निर्मळ स्वभावाने आटपाडीतील सर्व जातीतील आपल्या मागच्या पुढच्या इयत्तातील मुले त्याने आपलीशी केली . शाळेतील शिक्षक ही त्याच्यावर प्रभावीत होते . शाळेतले खेळ, महापुरुषांच्या जयंती – पुण्यतिथीचे कार्यक्रम, विविध सांस्कृतीक उपक्रम, वेगवेगळे उत्सव यामध्ये चमकुन उठणारा आणि अभ्यासातही *वरच* असणारा राजू प्रशालेचा अर्थात राजारामबापू हायस्कुलचा अष्टपैलु आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी होता . प्रशालेचे शिपाई, क्लार्क, इतर कर्मचारी, लगतच्या खादी भांडारातील कर्मचारी, कारगीर सर्वांनाच त्याने आपलेसे केले होते . इतरांसाठी वावरायला फिरायला फारशी मोकळीक नसली तर अजातशत्रू राजु खादी भांडारातील सर्वच ठिकाणी स्वच्छंदीपणे फिरायचा . शाळेतले मुलांचे तंटे – बखेडे, रुसवे – फुगवे सोडविण्यात राजीवच अग्रभागी असायचा . अर्थात प्रशालेतल्या मुलींमध्येही तो बंधुत्वाच्या भावनेने प्रियच होता . शाळेतले तसे संस्कार होते . मुलामुलींची एकत्र अशी भरणारी राजारामबापू हायस्कुल ही प्रशाला तशी आटपाडीतील एकमेव अशीच होती . पाटील – देशमुख – देशपांडे – भिंगे – चांडवले – इनामदारांच्या मुलांपासून फाटक्या झोपडीतल्या दलित, उपेक्षित,बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार मुलांतही राजु प्रियच होता . दलित असो मुसलमान यांच्या घरी दारी जावून खाणे पिणे करणे, त्यांचे साहित्य प्रसंगी कपडे वापरण्यातही त्याला विशेष आनंद व्हायचा. मटनाचे नाव घेणे सुद्धा अभिजन वर्गात ज्या काळी निशिद्ध मानले जायचे . त्या काळी हा बम्मन का बेटा छातीठोकपणे सर्वांच्या घरीदारी, अगदी माझ्या भारतीय भोजनालयात येवून दोस्तासमवेत खुलेआम मटन खायचा . मुलांच्या पार्टी साठी आठवडा बाजारातून अंडी आणणारा, इसाम मुलाणी – माझ्या वडिलांच्या अर्थात पापामियाँ खाटीक यांच्या दुकानात मटन चिकन नेणारा राजीव तसा फार मोठा धाडसी व बंडखोर स्वभावाचा होता . दुकानात येऊन मटन नेणारे शशिकांत पैठणकर सर यांच्यानंतरचा पोरसवदा वयातला दुसरा ब्राम्हण मी बघितला अनुभवला होता . द्वेष, मत्सर, तिरस्कार यापासून कोसो दुर राहीलेल्या राजीवने आपल्या निखळ सकारात्मक वागण्याने सर्व जाती धर्माच्या कुटुंबात वेगळे स्थान निर्माण केले होते . त्याचे त्या काळातील वागणे कसे हे अनुभवायचे असेल तर तुम्हांला *थ्री इडियएट* चित्रपटातील अमीरखानची भूमिका डोळ्यासमोर आणावी लागेल . मी अनेक वेळा हा चित्रपट पाहीला . अमीरखानच्या भूमिकेत मला माझा राजुच दिसायचा . या चित्रपटातल्या बहती हवा सा था वो या गीताने तर अक्षरशः मला वेडे बनवले . ते गीत, राजू साठीच तर लिहले गेले नाही ना ? असा प्रश्न मला नेहमीच सतावतो .

बहती हवा सा था वो
उड़ती पतंग सा था वो
कहाँ गया उसे ढूँढो..

बहती हवा सा था वो
उड़ती पतंग सा था वो
कहाँ गया उसे ढूँढो..

हम को तो राहें थी चलाती
वो खुद अपनी राह बनाता
गिरता संभालता मस्ती में
चलता था वो

हमको कल की फिक्र सताती
वो बस आज का जश्न मनाता
हर लम्हें को खुल के
जीता था वो

कहाँ से आया था वो
छू के हमारे दिल को
कहाँ गया उसे ढूँढो..

सुलगती धुप में छाओं के जैसा
रेगिस्तान में गाँव के जैसा
मन के घाव पे मरहम जैसा था वो

हम सहमें से रहते कूएं में
वो नदिया में गोते लगाता
उलटी धरा चीर के
तैरता था वो

बादल आवारा था वो
यार हमारा था वो
कहाँ गया उसे ढूँढो

हम को तो राहें थी चलाती
वो खुद अपनी राह बनाता
गिरता संभालता मस्ती में
चलता था वो

हमको कल की फिक्र सताती
वो बस आज का जश्न मनाता
हर लम्हें को खुल के
जीता था वो
कहाँ से आया था वो
छू के हमारे दिल को
कहाँ गया उसे ढूँढो..

या गीतातील अर्थाला सार्थच ठरविणारे राजूचे जीवन होते . गोरा पान चेहऱ्याचा, उंच शिडशिडीत बांध्याचा आणि प्रचंड उत्साही राजू अनेकांचे प्रेरणास्त्रोत होता . आटपाडीतील मित्रांशी आयुष्यभराचा लळा लावून तो सांगली – पुण्याला पुढच्या शिक्षणासाठी गेला . मी इकडे पत्रकारीतेत थोडे बहोत नाव कमावत होतो . त्याचवेळी पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्याने कारकिर्दीला सुरुवात केली . आणि आमचा मित्र राजू . ख्यातनाम पत्रकार राजीव खांडेकर या नावाने प्रसिद्धी पावू लागला .
राजीव खांडेकर हे आज महाराष्ट्रातील आघाडीच्या ‘एबीपी माझा’ ( पूर्वाश्रमीची ‘स्टार माझा’ ) या दूरचित्रवाणीच्या वृत्तवाहिनीचे ते मुख्य संपादक आहेत. राजीवने १९८९ मध्ये पुण्याच्या सकाळमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नाशिक सकाळ आणि पुण्याच्या लोकसत्तामध्ये काही काळ काम केल्यानंतर १९९५ पासून पुढे पाच वर्षे लोकसत्ताचे नवी दिल्ली येथील प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. या काळातील राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासंबंधीच्या त्याच्या अनेक बातम्या महाराष्ट्रभर गाजल्या. २००० मध्ये ईटीव्ही मराठी सुरू झाल्यावर त्या वाहिनीच्या मुंबई ब्युरोचे प्रमुख म्हणूनही त्याने अडीच वर्षे काम पाहिले. ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण आणि महाराष्ट्राचे राजकारण या दोन विषयांमध्ये त्याला गती आहेच पण कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. राजीव ‘ एबीपी माझा ’ मध्ये रुजू होण्यापूर्वी ‘लोकसत्ता’ मध्ये निवासी संपादक म्हणून काम करीत होता. मार्मिक राजकीय विश्लेषणा बरोबरच, या काळात लिहिलेला ‘हार्ट टु हार्ट’ हा कॉलमही, त्यातील शैलीदार भाषेमुळे वाचकांच्या स्मरणात राहिला. त्याच्या हार्ट टु हार्ट या पुस्तकाला नंतर उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. मार्मिक राजकीय विश्लेषण, संयत मांडणीची पद्धत आणि परखडपणासाठी त्याची ख्याती आहे. ‘एबीपी माझा’च्या उभारणीपासून अल्पावधीत महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय वृत्तवाहिनीचा मान मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय वृत्तवाहिन्यांच्या दर्जावर अंकुश ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड ॲथॉरिटीवर त्याची सन्माननीय नियुक्ती झाली आहे. या पदावर नियुक्ती झालेला तो पहिलाच मराठी संपादक आहे. देशभरातील सर्वच वृत्तवाहिन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्याचे काम ती संस्था करते.
एकमत पुरस्कार, महाराष्ट्र संपादक परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार, सासवडच्या आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा मानाचा पुरस्कार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, महर्षि नारद पुरस्कार, ‘हार्ट टु हार्ट’ पुस्तकाला उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार. अशा पुरस्कारांनी राजीव गौरविला गेला आहे .
आज “माझा कट्टा” हे त्याचे एक वैशिष्ट्य बनले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश मान्यवर आपली भूमिका मांडण्यासाठी माझा कट्ट्यावर येण्यास धडपडतात. हे त्याचे मोठे यश आहे. आटपाडीच्या मातीत लहानाचे मोठे झालेले हे शांत, संयमी, हसरे खेळकर व्यक्तीमत्व, आम्ही जेव्हा दुरचित्रवाणीच्या पडद्यावर पाहतो तेव्हा, ज्याला त्याला सांगतो हे आमच्या आटपाडीचे आहेत बर का ! . *”राजीव ! “* या नावाला साजेशी देहयष्टी आणि खांडेकर या आडनावाला साजेशी कार्यपताका . एबीपी माझा वृत्तवाहीनीत अभिमानाने डोलताना आम्ही पाहतो . समाजातील वेगवेगळ्या घटकांशी आपुलकीचा संवाद . उथळ झालेल्या पत्रकारीतेच्या काळात सखोल विश्लेशण . निडर वृत्तीने विषय मांडण्याची हातोटी आणि प्रसंगी वाद ओढवून घेऊन त्यावर चर्चा घडविण्याचे साहस तो दाखवतो आणि म्हणूनच मराठी वृत्त वाहिन्यांच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकाची वाहिनी होण्यास जबाबदार पत्रकारितेचे प्रतिक म्हणून आम्ही राजीवकडे पाहतो . माझा कट्टा सारख्या सुसंवादी कार्यक्रमाने नुकताच हजाराचा टप्पा पार केला. या कट्ट्यावर त्याने कोणाला नाही आणले ? समाजाची आजची गरज ओळखुन त्या त्या क्षेत्रातील सर्वोच्य योगदान देणाऱ्यांना बोलते केले. त्यांचे विचार जगभरातील मराठी प्रेक्षकांसमोर ठेवले . महाराष्ट्राला संवादी ठेवण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे . लहानपणापासून प्रवाहापेक्षा वेगळे काही करून दाखवण्यात त्याचा नेहमीच पुढाकार असायचा . इथल्या सर्व जाती – धर्मातील सवंगड्यांशी तो मिळून मिसळून राहीला . त्यांच्याशी जन्मभराचे रुणानुबंध जपले. आटपाडीला कधी विसरला नाही आणि *”मी आटपाडीकर “* सांगण्यात कधी मागे राहीला नाही . नुकतीच दै .सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्याची दोन तास मुलाखत घेतली . त्यामध्ये आटपाडीच्या आठवणी सांगताना त्याने त्या काळातल्या सौहार्दपूर्ण वातावरणाची आठवण काढली आणि आता तसा काळ राहिला नाही . याची खंतही व्यक्त केली. ही खंत आम्हा सर्वांनाच आहे. आपली आटपाडी पुन्हा त्या गोडव्याची व्हावी त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. संकुचित विचाराच्या प्रभावातून समाज बाहेर पडावा ही तळमळ त्याच्या बोलण्यात, वागण्यात दिसून येत होती. ती तळमळ आजही तो जपतो, त्याला जसा समाज हवासा वाटतो तसा तो प्रत्यक्षात यावा ही आजच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माझी ही सदिच्छा.


Back to top button
Don`t copy text!