स्थैर्य, औंध, दि. 08 : पुसेगाव औंध म्हासुर्णे राज्यमार्गाच्या दुतर्फा पुन्हा झाडांची हिरवाई फुलणार असून या कामाचा ठेका घेतलेल्या राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आज 2500 व्रुक्षलागवडीची मोहीम हाती घेतली आहे.
पुसेगाव-औंध म्हासुर्णे रस्ताच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रुंदीकरण करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिशय जुनी वड, लिंब, चिंच, करंज आदी जवळपास 733 झाडांची कत्तल करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर झाडे तोडल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र ही झाडे तोडताना एका झाडाच्या पाचपट नवीन झाडे लावण्याची अट ठेकेदाराला घालण्यात आली होती. शिवाय या झाडाच्या देखभालीची जबाबदारी देखील देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या वर्षी कंपनीने पहिल्या टप्प्यात या मार्गावर सुमारे 4000 झाडांची लागवड केली होती. दुसऱ्या टप्प्यात यावर्षी 2500 झाडे लावण्यात येणार आहेत. व्रुक्षलागवडीचा शुभारंभ नुकताच औंध येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस ए देसाई, माजी सभापती शिवाजीराव सर्वगोड, संदीप मांडवे, सपोनि उत्तम भापकर, सरपंच सौ सोनाली मिठारी, राजेंद्र माने, शितल देशमुख, सचिन शिंदे,बाबासाहेब घार्गे, संभाजी घार्गे, खराडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्त्याचे रुंदीकरण करताना अडथळा निर्माण करणारी झाडे तोडण्यात आली यासाठी 733 झाडे तोडण्याचा परवाना घेण्यात आला होता. तरीही 133 झाडे वाचवण्यात यश आले. पाचपट झाडे लावण्याची अट असली तरी प्रत्यक्षात दहा पट म्हणजे 6500 झाडांची लागवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षे या झाडाची देखभाल कंपनी करणार आहे. त्यामुळे पुन्हा नवीन झाडे जोमाने येतील.
एस ए देसाई, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वडूज