दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२५ | फलटण | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्रा. केंद्र शाळा जावली, ता. फलटण येथील इयत्ता ३ री मधील विद्यार्थिनी कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
मॅग व माऊली फौंडेशन, फलटण यांच्यावतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत विविध विषयांवर सुमारे ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने ‘माझे स्वप्न’ या विषयावर खुप प्रभावीपणे आपले विचार मांडले व छान विषय सादरीकरण केले होते.
सदर वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज दि. १ फेब्रुवारी रोजी अनंत मंगल कार्यालय फलटण येथे संपन्न झाला त्यावेळी कु. राजनंदिनी पडर हिने प्रथम क्रमांक मिळविल्याचे घोषीत करुन तिचा रोख रक्कम, सन्मानपत्र, गौरवचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मॅग फौंडेशनचे अध्यक्ष तथा मॅग फिन्सर्व्हचे चेअरमन अनंता मोहोटकर, माऊली फौंडेशन मुंबईचे कार्याध्यक्ष ॲड. विश्वनाथ टाळकुटे, प्रसिद्ध व्याख्याते राजेश मंत्री, मुधोजी महाविद्यालयातील निवृत्त प्रा. बाळासाहेब कांबळे, प्रा. नितीन नाळे, जोशी मॅडम यासह मान्यवर उपस्थित होते.
कु. राजनंदिनी पडर हिने मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल तिचे सर्व शिक्षक, जावली ग्रामस्थांसह परिसरातून विशेष अभिनंदन होत आहे.