अनिष्ट रुढी परंपरांचा बिमोड यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी प्रयत्न केले : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 05 जून 2023 | फलटण | आपल्या राज्यातील सामाजिक विषमता, अस्पृश्यता निवारण, स्त्री – पुरुष समानता, अनिष्ट रुढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून देत त्या उत्तम प्रशासक, आदर्श समाजकारणी आणि प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या होत्या असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, फलटण येथे उभारण्यात आलेल्या इंदोर येथील राजवाडा व क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृती मुळे होळकर घराण्याच्या पराक्रम आणि समाजहिताच्या राज्य कारभाराची आठवण करुन दिली जात असताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राजवाडा प्रतिकृती येथे ठेवण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर २९८ वी जयंती महोत्सव ३ दिवसीय समारंभास सुरुवात झाली. त्यानंतर समाज प्रबोधनपर व्याख्याने, गजी नृत्य, रक्तदान शिबीर, बाईक रॅली आणि शहरातील प्रमुख मार्गावरुन प्रचंड शोभा यात्रा असे या जयंती महोत्सवाचे स्वरुप होते.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कर्तृत्ववान राज्यकर्ती

महाराष्ट्रातील चौंडी, ता. जामखेड या छोट्याशा गावी जन्मलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी – खंडेराव होळकर – यांच्याशी विवाह झाला. खंडेरावांच्या मृत्यू पश्चात होळकर घराण्याच्या राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कौशल्याने स्वीकारली आणि जबाबदारीने उत्तम प्रकारे पार पडली, एवढ्यावरच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर थांबल्या नाहीत तर होळकर संस्थानचा किंबहुना त्या घराण्याच्यावतीने राज्यकारभार करताना राज्यातील लोकांच्या समस्या जाणून घेत, त्या तत्काळ सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

धर्मनिरपेक्षता, स्वतंत्रता, समता, बंधुता यांची बीजे रोवली

राज्याच्या हिताचे निर्णय घेत असताना आपली संस्कृती टिकावी यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, नदीवरील घाट, धर्मशाळा, आश्रम शाळा उभारल्या, होळकर साम्राज्यातील जनतेमध्ये धर्मनिरपेक्षता, स्वतंत्रता, समता, बंधुता यांची बीजे त्यांनी रोवल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

३०० वी जयंती तरुणांसमोर राजमाता यांचे आदर्श ठेवणारे उपक्रमांद्वारे

होळकर घराण्यातील एक कर्तबगार, पराक्रमी शूर राज्यकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन करतो असे सांगत त्यांची ३०० वी जयंती साजरी करताना त्यांच्या विविध क्षेत्रातील आदर्श कामांची ओळख नव्या पिढीसमोर ठेवणारे उपक्रम राबविण्याची घोषणा यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

एक स्त्री असूनही त्यांनी केलेले काम प्रेरणादायी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकर्त्या म्हणून केलेल्या लोकोपयोगी कामांची, प्रजेच्या हिताच्या निर्णयांची आठवण करुन देत २५० वर्षांपूर्वी एक स्त्री असूनही त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि शौर्याने दिलेला लढा, घेतलेले निर्णय प्रेरणादायी असून नव्या पिढीने विशेषतः तरुण वर्गाने त्यांच्या चारित्राचा अभ्यास करावा असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर.

रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद : १६० जणांनी केले रक्तदान

अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे आयोजित महा रक्तदान शिबीरात तब्बल १६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याचबरोबर शिवशाही व होळकरशाहीचे गाढे अभ्यास प्रा. यशपाल भिंगे यांच्या व्याख्यानाचे आयोजनास फलटण व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले तर यशपाल भिंगे यांच्या व्याख्यान प्रसंगी ते अध्यक्षस्थानी होते.

बाईक रॅली मध्ये तरुण – तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

शुक्रवार दि. २ जून रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणातून सुरु होऊन शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या मोटर सायकल (बाईक) रॅलीस फलटण तालुक्यासह शहरातील तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयकुमार शिंदे, समितीचे अध्यक्ष पै. बजरंग खटके, भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते, सचिन अहिवळे आदी मान्यवरांनी श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ केला.

शहरातील प्रमुख मार्गावरुन प्रचंड शोभायात्रा : शहर वासीयांनी दुतर्फा उभे राहुन घेतले दर्शन

शुक्रवार दि. २ जून रोजी शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या भव्य दिव्य मिरवणूकीस सायंकाळी ठीक ७ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामधून सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते राजमातांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी फलटण नगरपरिषद माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, ऋषिकांत नाईक निंबाळकर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य सचिन भैय्या सुभाषराव सुर्यवंशी बेडके, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन प्रा. भीमदेव बुरुंगले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती २०२३ चे अध्यक्ष पै. बजरंग खटके, कार्याध्यक्ष पै. बजरंग गावडे, उपाध्यक्ष रामभाऊ ढेकळे, समन्वयक नानासाहेब ईवरे व अन्य पदाधिकारी, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, महात्मा शिक्षण संस्था कार्याध्यक्ष प्रा. दादासाहेब चोरमले, शंकर लोखंडे, गजानन लोखंडे फलटण पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर, सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य महादेवराव पोकळे, पै. संजय देशमुख, रासप जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, युवा रासपचे जिल्हाध्यक्ष संतोष ठोंबरे, संदीप चोरमले, महादेव सोनवलकर, पै. रजनीकांत खटके आदी मान्यवरांसह शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त निघालेल्या भव्य – दिव्य मिरवणुकीमध्ये घोडे व घोड्यावर स्वार झालेल्या रणरागिणी अहिल्या, झांज पथक, मुलींचे लेझीम पथक, हलगी पथक, आकर्षक असा लाईटचा देखावा, तुतारी पथक, महाराष्ट्रातील नामांकित भव्य-दिव्य ओंकार डी. जे. अशा अनेक वाद्यासह खास करुन धनगरी गजी नृत्य मिरवणुकीचे लक्ष वेधून घेत होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामधून निघालेली मिरवणूक फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – भगवान महावीर स्तंभ – राजे उमाजी नाईक चौक – गजानन चौक या मार्गाने महात्मा फुले चौकामध्ये पोहोचल्या नंतर मिरवणुकीचा शांततेत समारोप करण्यात आला.

मिरवणूक आणि ३ दिवसातील सर्व कार्यक्रम उपक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून रासपचे लक्ष्मण शेंडगे, पै. अभिजीत जानकर, पोलीस पाटील संघटना प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर पाटील, दादासाहेब महानवर, अवि सुळ, ऋषिकेश बिचुकले, अजित शिनगारे, पै. खंडेराव भिसे, पै. भास्कर ढेकळे, आदित्य चोरमले, अजिंक्य चोरमले, सुमित उर्फ बाबु चोरमले, अनिल चोरमले, लहु चोरमले, पंकज सोनवलकर, अक्षय सोनवलकर, अमोल पोकळे, निलेश बुरुंगले, पै. विजय गोफणे, सोनवलकर (भाडलीकर) इत्यादी मान्यवर मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!