स्थैर्य, सातारा, दि. 16 : सातारा येथील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील डिपॉझिट म्हणून ठेवलेले 15 लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी 2 लाख 39 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणातील फरार असणारे आरोग्य निरीक्षक राजेंद्र विनायक कायंगुडे (वय 54) रा. एस. टी. कॉलनी पाठीमागे, गोडोली, सातारा यांना आज अटक करण्यात आली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेली माहिती अशी, सातारा नगरपरिषद येथील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील डिपॉझिट ठेवलेले 15 लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी सातारा पालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संचित धुमाळ यांनी 2 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये सत्यता आढळल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारानगरपालिकेच्या कार्यालय परिसरात सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना संचित धुमाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याच प्रकरणी पथकाने पालिकेचे आरोग्य निरीक्षक वर्ग 3 गणेश दत्तात्रय टोपे (वय 43), रा. यादोगोपाळ पेठ, सातारा आणि प्रवीण एकनाथ यादव (वय 51), रा. एस.टी. कॉलनीच्या पाठीमागे, गोडोली, ता. सातारा या दोघांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे (वय 54), रा. एस. टी. कॉलनी पाठीमागे, गोडोली, सातारा हे फरार झाले होते. त्यांना आज अटक करण्यात आली.