
महाबळेश्वरमधील ‘काठीवरील कसरत’ उपक्रमाने गाजले होते नाव; आता बॅडमिंटन कोर्टवरही दमदार कामगिरी.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ डिसेंबर : वयाच्या ५१ व्या वर्षीही खेळाची आवड आणि फिटनेस जपल्यास काय साध्य होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण फलटण तालुक्यातील धनगरवाडी (हिंगणगाव) शाळेतील शिक्षक श्री. राजेंद्र गोफणे यांनी घालून दिले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) आयोजित शिक्षक व कर्मचारी क्रीडा स्पर्धेत त्यांची बॅडमिंटन खेळ प्रकारात राज्य पातळीवर निवड झाली आहे. कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्पर्धेत त्यांनी नेत्रदीपक यश मिळवत ही मजल मारली आहे.
बॅडमिंटन कोर्टवर निर्विवाद वर्चस्व
राजेंद्र गोफणे सर हे एक उत्तम बॅडमिंटनपटू म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने होणाऱ्या शिक्षक व कर्मचारी क्रीडा स्पर्धेत त्यांनी बॅडमिंटन डबल्स प्रकारात सलग तीन वर्षे विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला आहे. खेळाडूंसोबतच ते एक उत्कृष्ट पंच देखील आहेत. जिल्हास्तरीय बॅडमिंटन पंच परीक्षा ते उत्तीर्ण असून, सध्या बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशनवर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. पुणे, अकलूज, बारामती आणि माळीनगर येथे झालेल्या विविध खुल्या स्पर्धांमध्येही त्यांनी आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे.
विद्यार्थ्यांसाठी ‘काठीवरील कसरत’ आणि समाजकार्य
गोफणे सरांची ओळख केवळ खेळाडू म्हणून नाही, तर एक उपक्रमशील शिक्षक म्हणूनही आहे. त्यांची नुकतीच महाबळेश्वर येथून फलटणला बदली झाली आहे. महाबळेश्वरमधील अतिदुर्गम अशा ‘दरे’ शाळेत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेला ‘काठीवरील कसरत’ हा साहसी उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात गाजला होता. या उपक्रमाची दखल घेत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते.
तसेच, महाबळेश्वरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात गोफणे सरांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध संस्था आणि मित्र परिवाराच्या मदतीने पाच गावांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवली होती.
वयाच्या ५१ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि फिटनेस राखून त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

