
स्थैर्य, तरडगाव, दि. ०९ सप्टेंबर : आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती तरडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. डॉल्बीमुक्त वातावरणात, पारंपरिक बॅण्डच्या गजरात काढण्यात आलेली भव्य मिरवणूक हे या जयंती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
जयंती दिनी सकाळी महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी येथून आणलेल्या ज्योतीचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. गावातील राजे उमाजी नाईक मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत, सजवलेल्या ट्रॉलीमधून राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्व मंडळांनी पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचे स्वागत केले.
या जयंतीनिमित्त ‘आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक तरुण मंडळा’च्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यात आले. शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल, रामोशी-बेरड समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल तसेच राजे उमाजी नाईक व बहिर्जी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या घोषणेबद्दल, मंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाप्रती समाधान व्यक्त केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.