
स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑक्टोबर : आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, फलटणच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या राजे गटाने पुन्हा एकदा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या अशाच मेळाव्यांनंतर गटाने घेतलेल्या धक्कादायक आणि अनपेक्षित भूमिकांमुळे, आता या मेळाव्यानंतर राजे गट नक्की कोणती राजकीय दिशा निवडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
राजे गटाच्या राजकारणात कार्यकर्ता मेळाव्यांना एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणताही मोठा राजकीय निर्णय घेण्यापूर्वी किंवा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्यापूर्वी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आणि आपली भूमिका निश्चित करण्यासाठी असे मेळावे आयोजित करण्याची गटाची परंपरा आहे. मात्र, या मेळाव्यांनंतर होणारे राजकीय बदल हे नेहमीच धक्कातंत्राचा भाग ठरले आहेत.
गत वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजे गटाने अशाच प्रकारे कार्यकर्ता मेळावा घेतला होता. या मेळाव्यानंतर गटाने दृश्य आणि अदृश्य पद्धतीने धैर्यशील मोहिते-पाटील यांना मदत केल्याचे दिसून आले होते, ज्याचा परिणाम मोहिते-पाटील यांच्या विजयात झाला होता. त्यावेळी गटाच्या या भूमिकेने अनेकांना आश्चर्यचकित केले होते.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही याच परंपरेची पुनरावृत्ती झाली. निवडणुकीपूर्वी कार्यकर्ता मेळावा पार पडल्यानंतर, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीर केलेली उमेदवारी नाकारून, राजे गटाचे नेते दिपक चव्हाण यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, मात्र राजे गटाने घेतलेल्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली होती.
आता पुन्हा एकदा नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना, राजे गटाने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या दोन निवडणुकांचा अनुभव पाहता, हा मेळावा केवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यापुरता मर्यादित न राहता, त्यातून आगामी काळातील मोठ्या राजकीय निर्णयांचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
या मेळाव्यानंतर राजे गट कोणाशी आघाडी करणार? स्वबळावर लढणार की एखाद्या नव्या समीकरणाला जन्म देणार? असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहेत. त्यामुळे या मेळाव्यातून राजे गटाचे नेतृत्व काय भूमिका जाहीर करते, यावरच फलटणच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे, हे निश्चित.