दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण शहराचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या मलठण परिसराला राजे गटाकडून कायमच कमी लेखले गेले आहे. या भागातील विकासकामे सुद्धा गत ३५ वर्षे एकहाती सत्ता राजे गटाकडे असून सुद्धा करता आली नाहीत. याची कबुली त्यांची नेते मंडळी देऊ लागली आहेत. त्यामुळे आता मलठण भागामध्ये मते मागण्यासाठी राजे गटाने येवूच नये; मलठणमधील जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; असे मत माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.
फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे राजे गटावर टीकास्त्र सोडले आहे.
सदरील प्रसिद्धीपत्रकामध्ये जाधव म्हणाले आहेत की; गेली 30 ते 35 वर्षे एक हाती सत्ता असताना राजे गटाने राजकारणा शिवाय काहीही केले नाही. विकास कामांचे नावाने बोंबाबोंब झाली आहे. आज फलटण शहरात पाण्याची समस्या, आरोग्याची समस्या, रस्त्यांची दुरावस्था, लाईट, कचरा यामधील कोणतीही समस्या सत्ताधारी मंडळींना सोडवता आलेली नाही. याच कालावधी मध्ये आपले मागून बारामतीची झालेली सुधारणा बघता आपण काय केले याचे आत्मपरीक्षण करावे.
लोकनेते माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे 18 महिन्याचे कारकीर्दीत मलठणचे डांबरीकरण तसेच मुस्लिम समाजाचे दफन भुमिस संरक्षण भिंत, व्हिशेप गटारे अशी अनेक कामे केली त्या नंतर गेली ५ वर्षाचे कारकीर्दीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मलठण मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, लोहार समाज मंदिर, वारकरी भवण, पिण्याचे पाण्याच्या 10 लाख लिटरच्या दोन टाक्या, अंगणवाडी, शहर नागरी सुविधा मधुन सरकारी आपला दवाखाना या कामांची सुरुवात झालेली आहे. प्रेमिलाताई चव्हाण हायस्कूल शेजारी स्टेडियम, जिम हॉल, स्विमिंग पुल अश्या 20 ते 25 कोटी रुपयांचे विकास कामांची वर्क ऑर्डर सुधा झालेली आहेत. यासोबतच फलटण शहरात जवळ जवळ 150 कोटी रुपयांची कामे मंजुर केलेली आहेत; असे सुद्धा जाधव यांनी स्पष्ट केले आहे.