दैनिक स्थैर्य | दि. १९ जानेवारी २०२४ | फलटण | विधानसभा निवडणुकीमध्ये राजे गटाचे उमेदवार असलेले दिपक चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर राजे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. राजे गटातील बहुतांश नेते मंडळी ही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्कात असून राजे गटातील अनेक दिगजांचा लवकरच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये गजानन चौकात जंगी सभेच्या आयोजन करून पक्षप्रवेश संपन्न होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली. या सभेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांची विशेष उपस्थिती असणार असल्याचे सुद्धा जाधव यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची वर्णी लागणार म्हणून एक शेवटची आशा राजे गटामध्ये शिल्लक होती. परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने ही राजे गटाची आशा सुद्धा पूर्णपणे मावळली आहे. आगामी काळामध्ये राजे गटामध्ये सुरू झालेली गळती थांबवणे आता राजे गटाच्या नेते मंडळींच्या हातामध्ये राहिलेली नसल्याचे मत सुद्धा यावेळी जाधव यांनी व्यक्त केले.