
स्थैर्य, फलटण, दि. 25 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या, रविवार (दि. २६) रोजी होणाऱ्या फलटण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे राजे गटात मात्र वेगळ्याच हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. गटातील माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी खाजगी बैठका घेतल्याचे समजते, तर दुसरीकडे सभेच्या आदल्या दिवशीच गटाचे काही प्रमुख पदाधिकारी ‘देवदर्शन’ आणि ‘ट्रिप’साठी फलटणमधून रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी फलटणमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या या दौऱ्याला मोठे राजकीय महत्त्व आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात काही पक्षप्रवेश होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राजे गटाने नुकताच एक मोठा कार्यकर्ता मेळावा घेतला होता. या मेळाव्यात आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी, कार्यकर्त्यांना आगामी संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशीच गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शहराबाहेर जाणे, हे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गटातील काही माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) सकाळपासून गटाचे काही निवडक प्रमुख पदाधिकारी देवदर्शनाच्या नावाखाली किंवा सहलीसाठी फलटणमधून बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे.
या पदाधिकाऱ्यांच्या अचानक शहराबाहेर जाण्यामागे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौर्याच्यामुळेच हा ‘प्रवास’ आखला गेला आहे का, अशी दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरू आहे. राजे गट सध्या कोणत्या राजकीय भूमिकेत आहे, याबाबतची संदिग्धता आणि नुकत्याच झालेल्या काही पक्षबदलांच्या पार्श्वभूमीवर, या घडामोडींमुळे राजकीय विश्लेषकांकडून विविध अंदाज बांधले जात आहेत.

