दैनिक स्थैर्य | दि. १९ जानेवारी २०२४ | फलटण | ‘‘राजे गटाकडे आमच्यासारख्या निष्ठावंतांची मोठी फौज आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील जनता यांच्या पाठींब्यावर राजे गट अभेद्य आहे. विरोधकांना कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत कोणताही फायदा होणार नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राजे गटाचाच झेंडा फडकेल’’, असा विश्वास राजे गटाचे कट्टर कार्यकर्ते प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये व्यक्त केला आहे.
प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, ‘‘राजे गटाचे कार्यकर्ते खासदार गटात प्रवेश करणार असल्याचे देण्यात आलेले वृत्त कार्यकर्त्यांना विचलित करण्याच्या उद्देशाने आणि स्वत:च्या प्रसिद्धीच्या हौशेसाठी देण्यात आलेले आहे. राजे गटाचा कोणताही निष्ठावंत कार्यकर्ता यामुळे विचलित होणार नसून त्यांचा हा प्रयत्न फोल ठरणार आहे.’’
‘‘आमचे नेतृत्त्व आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले काम हीच आमची जमेची बाजू असून निवडणूकीतील एका धक्क्याने राजे गट खचणारा नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राजे गट जनतेच्या पाठबळावर पुन्हा एकदा फिनीक्स पक्षाप्रमाणे भरारी घेताना दिसेल’’, असा ठाम विश्वासही प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केला आहे.