दैनिक स्थैर्य | दि. 30 जानेवारी 2024 | फलटण | आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात कार्यरत असणाऱ्या राजे गटाचा कोळकी येथील अनंत मंगल कार्यालय येथे दि. 01 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेणार असल्याचे समजत आहे.
याबाबत खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की; गत काही महिन्यांपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये घडलेल्या घडामोडीनंतर ना. अजितदादा पवार यांच्यासोबत जावून सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर फलटणमध्ये अनेक घडामोडी घडल्या असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने माढा लोकसभा मतदारसंघासाठी फलटणमध्ये नक्की काय भूमिका घ्यायची ? याबाबत मते जाणून घेवून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे समजत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे माढा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची भेट घेत आगामी रणनीती आखत असल्याचे समोर येत आहेत.
आगामी माढा लोकसभा निवडणुकीबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे नक्की काय भूमिका जाहीर करणार या कडे तालुक्यासह माढा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.