दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । फलटण । फलटण नगरपरिषदेच्या राजधानी टॉवर येथील अनियमित बांधकामाविरोधातली लढाई संपली नसून या प्रकरणात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे फलटण नगरपरिषदेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून राजधीनी टॉवर्स ही ईमारत बांधली गेलेली आहे. ह्या ईमारातीमध्ये काही व्यावसायिकांच्या फायद्यासाठी नियमबाह्य बदल केल्याची तक्रार फलटण नगरपरिषदेमधील विरोधकांनी सत्ताधार्यांवर केलेले होते व त्या अनुषंगाने सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देवून उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला होता. त्या नुसार सातारचे सहाय्यक नगररचनाकार यांनी राजधानी टॉवर्समधील त्या बांधकामाच्या पुढील कामास स्थगिती दिलेली होती. परंतू ह्या मध्ये सत्ताधारी गटाने थेट नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला व या मध्ये नियमानुसारच नगरपरिषदेने बांधकाम केले असल्याबाबतची माहिती नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना दिली. त्यानुसार नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे नगरविकास विभागाच्या सचिवांना आदेश दिले व फलटण नगरपरिषदेच्या राजधानी टॉवर्समधील त्या बांधकामाच्या स्थगिती आदेशालाच स्थगिती दिली. यानंतर अशोकराव जाधव यांनी आपली पुढील भूमिका प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केली.
पालिकेकडून करण्यात आलेले बेकायदेशीर काम वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न श्रीमंत सभापतींकडून सुरु आहे. एकीकडे शहरातील जनतेची अतिक्रमणे अमानुषपणे काढून त्यांना रस्त्यावर आणायचे आणि दुसरीकडे पालिकेचे बेकायदेशीर काम वाचवण्यासाठी नगरविकास मंत्रालयाचा स्थगिती आदेश जर ते आणत असतील तर हा फलटण शहरातील जनतेवर एक प्रकारे अन्यायच आहे. त्यामुळे या प्रकरणात ‘ दूध का दूध और पानी का पाकी’ करण्यासाठी आपण पालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी, नगररचना सातारा व नगरविकास खाते या सर्वांविरोधात न्यायालयात न्याय मागणी करुन यांना पाठीशी घालणार्या नगरसेवकांना घरी बसवणार असल्याचा, इशाराही अशोकराव जाधव यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.