दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । सातारा । स्वातंत्रोत्तर भारताचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत असून यानिमित्ताने ऐतिहासिक सातारा शहरात उभारण्यात आलेल्या ‘राजधानी सातारा’ सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्याची स्पर्धा कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हि स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राजधानी सातारा सेल्फी महोत्सव स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद भेटत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून हि बाब अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. सेल्फी स्पर्धेसाठी सेल्फी पॉईंटवर गर्दी होत असून त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता गर्दी टाळणे अनिवार्य आहे आणि त्यामुळेच कर्तव्य सोशल ग्रुपने राजधानी सातारा सेल्फी महोत्सव स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सौ. वेदांतिकाराजे यांनी म्हटले आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या स्पर्धेबाबत पुढील सूचना देण्यात येणार असून त्यानंतर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. याची नोंद सर्वांनी घ्यावी. तसेच कोरोना पासून स्वतःचा आणि कुटुंबियांचा बचाव करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले आहे.