राजर्षी शाहू महाराज तुम्हीच दृष्टी दिली….!!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुन २०२१ । सातारा । राजर्षी शाहू महाराज हे आधुनिक भारताच्या मानवी विकासाला चालना देणारे दूरदृष्टीचे लोकराजा… लोकशाहीत अभिप्रेत असलेला “मानव ” केंद्रित विकास… त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात देशात पहिल्यांदा सुरु केला… धर्म आणि जातीच्या भिंती तोडणारी सर्वात क्रांतिकारी गोष्ट म्हणजे शिक्षण, याच जाणिवेतून त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली… सामाजिक परिवर्तनाचा वसा घेऊन अनेक सुधारणावादी पावले टाकली, पुढे त्यांच्या या पावलांचा हमरस्ता झाला… बहुजनांची विद्यार्थी शिकायला लागली… त्यांच्याच दूरदृष्टीचे ते फलीत होते… त्यांनी विकासाला मानवी चेहरा देण्यासाठी काय काय केलं याची थोडक्यात उजळणी केली तरी त्यांचे आभाळा एवढे कर्तृत्व आपल्या लक्षात येईल… म्हणून हा लेख लिहण्याचा प्रपंच…!!

• शाहू महाराजांनी कोल्हापूर मिरज रेल्वे मार्ग कोल्हापूर संस्थान चे खर्चाने तयार केला. 3 मे 1888 रोजी पायाभरणी आणि 20 एप्रिल 1891 रोजी रेल्वे वाहतूक शुभारंभ झाला.
• 1896 ला प्लेगची साथ आली आणि त्यांच्यातला द्रष्टा राजकर्ता कामाला लागला… त्यानिमित्ताने आरोग्य सुविधा उभ्या केल्या.
• मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा करून अंमलबजावणी केली.
• शिक्षणाचा प्रचार- प्रसार व्हावा म्हणून 1916 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून शाळा, महाविद्यालये, बोर्डिंग, शिष्यवृत्त्या सुरू केल्या.
• 1918 साली त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. स्वतःच्या घरात इतर जातीच्या घराण्याची नाते जुळून कृतीत उतरवून आणला.
• शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्यांतच्या सहकारी संस्थांची स्थापना.
• नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ऍग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

हे आणि असे अनेक गोष्टी सामाजिक बदलासाठी कारणीभूत असलेल्या गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी केल्या… त्यासाठी स्वकीय आणि वैचारिक विरोधक यांचा कडवा विरोध मोडून हे सगळं उभं केलं… आणि सिद्ध करून दाखवलं.. नवनिर्माण करण्यासाठी प्रस्थापितांचा रोष किती प्रचंड असतो हे दाखवून दृष्टी दिली. पण त्यानंतरच्या काळात आमच्या दृष्टीला झालेल्या मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करणारा मिळाला नाही… तो मिळावा… यासाठी तुमचे स्मरण… तुमच्या स्मृती दिनानिमित्त आमच्या डोळ्यात तुमच्या कृतीचं स्मरणअंजन….. भव्यता, विशालता तुम्ही कृतीतून दाखवून दिली… या महान कार्याला आमचे वदंन ..!!

– युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी


Back to top button
Don`t copy text!