राजर्षी शाहू महाराज हे रयतेचे राजे म्हणून कायम हृदयात राहतील : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । फलटण । “राजर्षी शाहू महाराज खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते. रयतेनं कामासाठी सरकारकडे येण्याची गरज नाही, सरकारंच रयतेच्या दारात जाईल, हा विचार त्यांनी दिला. शिक्षणाशिवाय बहुजनांचा विकास शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली करुन दिली. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं केलं. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना आर्थिक दंडाची तरतूद केली. नाटक, चित्रपट, संगीत कलेला आश्रय दिला. कोल्हापूरला चित्रपटनगरी बनवली. कुस्तीगिरांना प्रोत्साहन दिलं. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरासाठी संस्था काढल्या. राधानगरीसारखं धरण बांधलं. लोककल्याणकारी राज्याचा वारसा पुढे नेणारे राजर्षी शाहू महाराज रयतेचे राजे म्हणून कायम हृदयात राहतील, असे विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

“राधानगरीसारखं धरण बांधलं. त्यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांनी जलसंधारणक्षेत्रात क्रांती केली. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकरी व्हावं, सैन्यात जावं, त्याबरोबरीनं उद्योग, व्यापार क्षेत्रातही भरारी घ्यावी, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी कोल्हापूर संस्थानात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारल्या. उद्योगांचं जाळं निर्माण केलं. जयसिंगपूरला बाजारपेठ वसवली. कोल्हापूर संस्थानात पायाभूत सुविधांची उभारणी करतानाच समाजात प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारांची रुजवण केली. रयतेची काळजी घेणारे, विकासाची दूरदृष्टी असलेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणाच्या विचारांचे वारसदार म्हणून राजर्षी शाहू महाराज कायम सर्वांच्या हृदयात राहतील. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन.” अश्या भावना विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केल्या.


Back to top button
Don`t copy text!