
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित राजाळे येथील श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी, सोहम विजय शिनगारे याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. कराड येथे झालेल्या ‘मिशन ऑलम्पिक गेम्स असोसिएशन’च्या राज्यस्तरीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत त्याने ५१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या विजयामुळे त्याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कराड येथील लोकमत कॅम्पस क्लबमध्ये या राज्यस्तरीय स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोहम शिनगारे याने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम विजेतेपद मिळवले. त्याच्या या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी सोहमचे अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभावेळी श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जाधव, क्रीडा शिक्षक बाचल आणि सोहमचे वडील विजय शिनगारे उपस्थित होते. सोहमच्या या यशाने श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

