राजाळेचे शहीद जवान वैभव भोईटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
लडाखमध्ये लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातात राजाळे (ता. फलटण) येथील वैभव संपतराव भोईटे या जवानास वीरमरण आले. या घटनेने संपूर्ण राजाळे आणि परिसरात शोककळा पसरली आहे. वैभव भोईटे यांचे पार्थिव आज दुपारी राजाळे येथे येईल. त्यानंतर शासकीय इतमानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लडाखमधील लेह जिल्ह्यात लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये राजाळे, ता. फलटण येथील वैभव संपतराव भोईटे (वय ३१ वर्षे) या जवानाचा समावेश आहे. लेह लडाखमधील या दुर्घटनेचे वृत्त समजताच राजाळे गावातील बाजार पेठ बंद झाली आणि संपूर्ण व्यापार व्यवहार बंद झाले आहेत. राजाळे पंचक्रोशीसह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

लडाखमध्ये होती पोस्टिंग

लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी नेमणुकीच्या ठिकाणी निघालेल्या या जवानांच्या वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सैनिकांना घेऊन निघालेले लष्करी वाहन दरीत कोसळले. लष्कराच्या वाहनात १० सैनिक होते. त्यापैकी या अपघातात ९ जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे.

शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पश्चात पोलीस दलात कार्यरत पत्नी प्रणाली, मुलगी हिंदवी (वय दिड वर्ष), आई बिबीताई, वडील संपतराव धोंडीबा भोईटे, २ विवाहित बहिणी, २ चुलते मोहन भोईटे व विलास भोईटे (वरिष्ठ जेल अधिकारी, बीड) असा परिवार आहे.

पोलीस दलावरही शोककळा

शहीद जवान वैभव भोईटे हे लष्कराच्या ३११ आर्टिलरी रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची लडाखमध्ये पोस्टिंग होती. पोस्टिंच्या ठिकाणी जात असताना वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ते शहीद झाले. त्यांची पत्नी प्रणाली भोईटे ह्या सातारा पोलीस दलात दहिवडी, ता. माण येथे कार्यरत आहेत. त्यामुळे वैभव यांच्या शहीद होण्याने सातारा जिल्हा पोलीस दलावर देखील शोककळा पसरली आहे.


Back to top button
Don`t copy text!