दैनिक स्थैर्य | दि. २२ मे २०२३ | फलटण |
राजाळे (ता. फलटण) गावाने महावितरण कंपनीला उपकेंद्रासाठी वेळोवेळी सहकार्य करूनदेखील येथील विजेचा लपंडाव काही थांबत नसल्यामुळे राजाळे गावचे नागरिक, शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
राजाळे गावाने मागील दहा वर्षांपूर्वी वीज वितरण कंपनीच्या मागणीनुसार उपकेंद्रासाठी भरपूर जागा उपलब्ध करून दिली आहे. उपकेंद्र झाल्यावर आपल्या गावात विजेचा लपंडाव होणार नाही, असे आश्वासन त्यावेळी वीज अधिकार्यांनी दिले होते. पण, गावकर्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे. कुठेही घोटाळा झाला की, राजाळे गावची वीज घालवली जाते. म्हणजे जागा दिली आणि फायदा मात्र शेजारच्या गावांचा, असा प्रकार राजाळे गावचा झाला आहे.
टाकळवाडे येथे सबस्टेशन झाल्यावर परिस्थिती सुधारेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, विजेच्या बाबतीत परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. प्रचंड उन्हाळा आहे, त्याचा त्रास वृध्द लोकांना होत आहे, लहान मुलांना होत आहे. पण, कोणीही एक शब्द बोलायला तयार नाही. मंगळवारी दुरूस्तीच्या नावाखाली वीज नसते. पण, दररोज वीज गायब होत असते. याचा त्रास शेतकरी, सर्व सामान्यांना होत आहे.
येत्या दहा दिवसात वीज वितरणच्या कामात सुधारणा झाली नाही तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात रसिक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंचच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.