
-
१९९० च्या दशकातील कापूस उत्पादक गाव आता दुग्धव्यवसायात अग्रेसर
-
गावात दररोज १८ ते २० हजार लिटर दुधाचे संकलन; १०-१२ संकलन केंद्रे कार्यरत
-
आधुनिक ‘मुक्त संचार गोठ्यां’ना परदेशी दुग्ध उत्पादकांच्या भेटी
-
महिलांच्या पुढाकाराने ग्रामीण अर्थकारणाला मिळाली नवी दिशा
स्थैर्य, राजाळे, दि. २७ नोव्हेंबर, सुजित निंबाळकर : एकेकाळी कापूस आणि त्यानंतर उसाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण तालुक्यातील राजाळे गावाने आता आपली ओळख बदलली आहे. शेतीला हमखास आणि रोज पैसा मिळवून देणारा पूरक व्यवसाय म्हणून येथील शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाला पसंती दिली आहे. आजमितीस राजाळे गावात दररोज तब्बल १८ ते २० हजार लिटर दुधाचे संकलन होत असून, हे गाव खऱ्या अर्थाने ‘दूध पंढरी’ बनले आहे.
कापूस ते दूध: एक आर्थिक प्रवास
१९९० च्या दशकात राजाळे आणि परिसरात कापसाचे मोठे उत्पादन होत असे. त्यानंतर उसाचे क्षेत्र वाढले आणि तालुक्यात चार साखर कारखाने उभे राहिले. मात्र, उसाच्या बिलासाठी वाट पाहावी लागते. याला पर्याय म्हणून आणि दैनंदिन खर्चासाठी हाताशी पैसा असावा, या उद्देशाने राजाळे गावातील शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायावर लक्ष केंद्रित केले. आज त्याचा परिणाम म्हणून गावात १० ते १२ दूध संकलन केंद्रे आणि एका नामांकित कंपनीचा दूध शीतगृह प्रकल्प (Chilling Plant) उभा राहिला आहे.
महिलांनी घडवली ‘धवलक्रांती’
या यशामध्ये गावातील महिलांचा वाटा सिंहाचा आहे. जनावरांच्या देखभालीपासून ते दूध काढण्यापर्यंतच्या कामात महिलांनी आघाडी घेतली आहे. फलटण तालुक्यातील विस्तारलेल्या दूध प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे चित्र राजाळे गावात स्पष्टपणे दिसून येते.
आधुनिक तंत्रज्ञानाची कास
राजाळे गावातील शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता आधुनिकतेची कास धरली आहे.
-
मुक्त संचार गोठा: गावातील आदर्श मुक्त संचार गोठ्यांना परदेशातील दूध उत्पादकांनीही भेटी दिल्या आहेत.
-
तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण: दूध उत्पादन वाढीसाठी मुरघास निर्मिती, चारा व्यवस्थापन, उच्च वंशावळ जोपासणे आणि कालवड संगोपन स्पर्धांचे आयोजन केले जाते.
-
कार्यशाळा: जनावरांच्या आजारांचे निदान आणि मार्गदर्शनासाठी गावात नियमित कार्यशाळा घेतल्या जातात, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
रोजगाराच्या नव्या संधी
गावात दुग्धव्यवसाय वाढल्याने अनेक अनुषंगिक व्यवसायांना चालना मिळाली आहे. पशुवैद्यकीय सेवा, जनावरांसाठी खाद्य निर्मिती, आधुनिक यंत्रसामग्री, लॅब आणि दूध वाहतूक (ट्रान्सपोर्ट) यांतून गावात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे. पूर्वी बोटावर मोजण्याइतकी असणारी दूध संकलन केंद्रे आज गावोगावी विस्तारली असून, खाजगी आणि शासकीय प्रकल्पांमुळे फलटण तालुका आता ‘दूध पंढरी’ म्हणून नावारूपास आला आहे.

