राजाळे ग्रामपंचायतीला १५ दिवसात अतिक्रमण पाडण्याचे आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 05 मार्च 2025। राजाळे । मौजे राजाळे (ता. फलटण) गावातील जुना जानाई मंदिर रोड ते सरडे रस्ता अतिक्रमण काढून खुला करण्याचे आदेश तहसीलदार फलटण यांनी ग्रामसेवक, राजाळे ग्रामपंचायत यांना दिले आहेत, अशी माहिती राजाळे येथील निखिल तानाजी निंबाळकर यांनी दिली.

सदर प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देताना निखिल निंबाळकर यांनी सांगितले की, गट नं ६२६ ६२७ ६२८ लगतचा जुना जानाई मंदिर ते सरडे पालखी रस्ता बंद करून २००८ साली ग्रामपंचायत राजाळे यांनी पुण्यातील संतोष पांडुरंग मेंगे या व्यक्तिच्या नावावर मुळ भोगवटादार रामचंद्र बयाजी बनकर यांच्या कडून विकसन करार करून जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता संबंधीत १४१ चौ.मी जागा बांधकामासाठी दिली होती पण प्रत्यक्ष १४१ चौमी बांधकाम न करता ३०० चौमी हून अधिक जागेत अतिक्रमण करून इमारत बांधून रस्ता बंद केला होता. तक्रारदार निखिल तानाजी निंबाळकर यांनी ९/०६/२०२२ रोजी जिल्हाधिकारी व भूमिअभिलेख अधिक्षक सातारा यांना ग्रामस्थांच्या सह्या घेऊन रस्ता खुला करण्यासाठी निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी यांनी भूमि अभिलेख कार्यालयात पैसे भरून दिनांक १९/१०/२०२२ रोजी मोजणी केली होती व अतिक्रमण नकाशा तयार करून दिला होता. त्यानुसार तहसिलदार यांनी ग्रामसेवक, ग्रामपंचायत राजाळे यांना अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. परंतु ग्रामपंचायतीने त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती.

राजकीय दबाव असल्यामुळे तक्रार दाखल केल्या नंतर जिल्हाधिकारी यांना रस्ता बंद करण्याची परवानगी ग्रामपंचायत ठराव करून २०२२ ला मागणी केली होती परंतु सगळे प्रकरण जिल्हाधिकारी यांनी तपासले असता अतिक्रमण व शासकीय जागेचे दस्त करून गाळे विकल्याचे व विकसन करार ३ वर्ष झाल्या नंतर संपल्याचे पुन्हा असा करार भाडे पट्टा न केल्याचे निदर्शनास आल्यावर तहसिलदार यांना अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दिले आहेत. त्यानुसार तहसिलदार फलटण यांनी अतिक्रमण काढण्यास सक्षम अधिकारी म्हणून अतिक्रमण केलेल्या व्यक्तिवर दिनांक २०/०२/ २०२५ रोजी फौजदारी खटला दाखल करून १५ दिवसात अतिक्रमण काढण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असेही निखिल निंबाळकर यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!