आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी राजभवन उजळणार


 

स्थैर्य, मुंबई, दि.१२: या दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी उजळणार आहे.

स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनातील कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह बांबूपासून आदिवासी महिलांनी तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाशकंदील भेट दिले.

राजभवन येथील स्थायी कर्मचारी राजभवन सुंदर व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली होती. त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली होती. अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्पादने विकत घ्यावी असे आवाहन करताना आपण राजभवनापासून याची सुरुवात करू असे कोश्यारी यांनी सांगितले होते.

त्यानुसार विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली, बोट, दुर्वेश व गोजे येथील आदिवासी महिलांनी आकाशकंदील तयार करून राजभवन येथे पाठविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदुषणरहित साजरी करावी, असे आवाहन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी केले आहे.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव प्राची जांभेकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!