
दैनिक स्थैर्य । दि. 18 फेब्रुवारी 2022 । मुंबई । प्रोपेल्ड या शिक्षणावर भर देणाऱ्या फिनटेक प्लॅटफॉर्मने, वेस्टब्रिज कॅपिटलच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या सीरिज बी फंडिंगमध्ये २६२ कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. स्टेलारिस व्हेंचर पार्टनर्स आणि इंडिया कोशंट या कंपनीच्या आधीपासूनच्या गुंतवणूकदारांनीही या फेरीत सहभाग घेतला. आयआयटी मद्रासमधील बिभू प्रसाद दास, व्हिक्टर सेनापती आणि ब्रिजेश समंतराय या त्रिकुटाने २०१७ मध्ये स्थापन केलेल्या प्रोपेल्डचे ५५०हून अधिक शिक्षणसंस्थांसोबत टाय-अप्स आहेत आणि सध्या ही कंपनी वर्षाला ६०० कोटी रुपय या दराने कर्ज वितरण करत आहे.
निधीउभारणीच्या या फेरीनंतर, वित्तीय सेवांची उपलब्धता कमी असलेल्या भागांत आपले कर्ज पुस्तक (लोन बुक) जलद गतीने वाढवण्याची आणि विद्यार्थी व सहयोगी संस्था या दोहोंचा वापर अनुभव सुधारण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात्मक प्लॅटफॉर्मच्या क्षमता वाढवण्याची, प्रोपेल्डची योजना आहे.
प्रोपेल्डचे सहसंस्थापक आणि सीईओ बिभू प्रसाद दास म्हणाले, “ज्या विद्यार्थ्यांना पारंपरिक वित्तीय संस्थांची सेवा मिळत नाही, त्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यात आम्ही सक्षम ठरलो आहोत. शहरात आत्तापर्यंत सक्रिय झालेल्या सहयोगांमधून आम्हाला लक्षणीय शक्ती मिळत आहे, त्यामुळे आमचा आमच्या व्यवसाय प्रारूपावरील तसेच बाजारपेठेतील संधींवरील विश्वास बळकट होत आहे.”
प्रोपेल्डचे सहसंस्थापक ब्रिजेश समांतराय म्हणाले, ““शिक्षणक्षेत्रात दीर्घकाळापासून आवश्यक असलेली चाकोरीबाह्य कर्ज उत्पादने आणून, शिक्षणाच्या बाजारपेठेतील कर्जपुरवठ्याचे प्रमाण वाढवण्याचे तसेच देशातील शिक्षणसंस्थांमधील प्रवेशाचे प्रमाण वाढवण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे.”