दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । खटाव । कातरखटाव (ता. खटाव) येथे आज सकाळी 9 वाजता सांगलीहून गाझीयाबाद येथे बेदाणा घेवून निघालेला ट्रक पलटी झाल्याने दोघेजण जखमी झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिरज-भिगवण हा राज्य मार्ग कातरखटाव गावातून जातो. या मार्गाचे मनमाड-बेळगाव या राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर झाले आहे. या मार्गावर सतत अवजड वाहनांची वाहतुक सुरु असते. रस्त्याचे गेल्या दोन महिन्यापुर्वीच नुतनीकरण झाले आहे. ठेकेदाराने रस्त्याच्या कडेच्या साईडपटटया ही भरलेल्या नाहीत. या बाबत वर्तमानपत्रातून आवजही उठवला होता. आज सकाळी 9 वाजता बेदाण्याने भरलेला ट्रक (आरजे 11 जीबी 4146) सांगलीहून गाझीयाबादकडे निघाला होता. हा ट्रक विजयराज हॉटेलच्या समोर आला असताना समोरून येणार्या दुसर्या ट्रकला साईड देत असताना चाके रस्त्यावरुन खाली उतरली. रस्त्याची साईडपटटी खोल असल्याने चालकाचा ताबा सुटला. दुध घालण्यासाठी निघालेल्या कातरखटावच्या सतिश जंगम (वय 47) या युवकास ताबा सुटलेल्या ट्रकने धडक दिली व पुढे शंभर मीटरवर जावून हा ट्रक पलटी झाला. मोठा आवाज झाल्याने आजुबाजूचे लोक गोळा झाले व ट्रकमध्ये असणा-या दोघांना बाहेर काढले. यामध्ये ट्रकचा क्लिनर ब्रिजेश पाल (वय 27) हा किरकोळ जखमी झाला. तर सतीश जंगम यांच्या डोक्यास जोरात धडक दिल्याने ते बेशुदृध होउन गंभीर झाले आहेत. ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकमधील बेदाण्याची बॉक्स अस्ताव्यस्त पडलेली आहेत. लोक मात्र बेदाणे पळवण्याचा प्रयत्न करीत होते.
ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदण्यात यावा : रत्नाकर बोडके
ठेकेदाराने रस्त्याच्या साईपटटया न भरल्यामुळे हा अपघात झाला आहे. या दोन महिन्यात आठ अपघात झाले आहेत. यामध्ये बर्याचजणांना जायबंदी व्हावे लागले आहे. प्रशासन लोकांच्या मृत्युची वाट बघतंय का? डोळेझाक केलेल्या प्रशासनाला लोकांचे जीव गेल्यानंतर जाग येणार का? संबंधीत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याचा बांधकाम ठेका रदद करण्यात यावा.