म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करा; खाजगी रुग्णालयांनी आरोग्य प्रशासनाशी समन्वय ठेवावा : कृषीमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मालेगाव, दि.१४: कोरोनासंसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती घटल्यामुळे काही रुग्णांना म्युकरमायकोसिस या नवीन आजाराचा त्रास होत आहे. या आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत याचा समावेश केला आहे. पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी कान, नाक, घसा तज्ज्ञांची नेमणूक करून या आजारापासून रुग्णांना दिलासा देण्याचे काम करण्याबरोबर या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

कोरोनानंतर आता पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस आजार प्रचंड वेगाने वाढत असल्याने यावर उपाययोजना आखण्यासाठी आज शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, सामान्य रुग्णालयाचे डॉ.हितेश महाले, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना ठाकरे यांच्यासह शहरातील सर्व बालरोगतज्ञ, कान, नाक व घसा तज्ञ उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.भुसे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होवू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता, मात्र आता जिल्ह्यात पोस्ट कोविडनंतर म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे म्युकरमायकोसिस आजार होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असल्याने ज्या रुग्णांना या आजाराची लक्षणे जाणवतात त्यांनी तात्काळ फिजिशियन, कान, नाक व डोळे यांच्या आजावरील तज्ज्ञ डॉक्टराकडून वेळीच उपचार करून घेण्याचे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले आहे.

मंत्री श्री.भुसे म्हणाले, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना अधिक धोका संभवत असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत असल्यामुळे शहरातील बालरुग्णालयातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी पालकांनी घेऊन त्यांना घराबाहेर जाण्यापासून रोखावे. बालरुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची संख्या वाढविण्यात यावी. भविष्यातील संभाव्य धोके ओळखून शासनासह महानगरपालीका व खाजगी रुग्णालयांनी आपसात समन्वय ठेवून या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही मंत्री श्री.भुसे यावेळी म्हणाले.

आरोग्य प्रशासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधा गरजेच्या असल्याचे सांगतांना अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम म्हणाले, सर्व खाजगी डॉक्टरांनी सामाजिक दायित्वातून रुग्णसेवेत योगदान दिल्यास पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस या आजारावर मात करण्यास वेळ लागणार नाही. त्याच बरोबर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी मधुमेही रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!