
स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यात गुरुवार दि. २५ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास प्रचंड वादळ वारे आणि वीजांच्या कडकडाटात सरासरी ३८.४४ मि. मी. पाऊस झाला असून वादळ वाऱ्याने खुंटे ता. फलटण येथे राहती घरे, जनावरांचे गोठे यांचे पत्रे उडून गेले, वीजेचे अनेक खांब जमीनदोस्त झाले असून वीज वाहक तारा तुटल्याने तसेच ऊस, मका व अन्य उभी पिके अक्षरशः आडवी झाल्याने सर्व घटकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने याची त्वरित दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी, वीजेचे पडलेले खांब व वीज वाहक तारा त्वरित दुरुस्त करुन वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान पावसाने सुरुवात केली असली तरी हा मान्सूनचा पाऊस आहे की वळीवाचा असा प्रश्न निर्माण होत आहे कारण कालच्या पावसात वादळ, वारे, वीजांचा प्रचंड कडकडाट असल्याने वळीव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, वादळ वारे एवढे प्रचंड होते की घरावरील पत्रे सुमारे ५०० फुटावर जाऊन पडले होते तर एका घरावरील पत्रे वाऱ्याने उडून सुमारे ३०/४० फूट उंचीवर एका झाडावर पडले आणि तेथेच अडकून राहिल्याने वादळाची तीव्रता व भीषण स्वरुप स्पष्ट झाले आहे, त्यामुळेच मोठे मोठे वृक्ष आणि वीजेचे खांब उन्मळून पडले आहेत.
तालुक्यात काल रात्री सरासरी ३८.४४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस तरडगाव येथे ८५ मि. मी. झाला आहे. अन्यत्र झालेला पाऊस खालीलप्रमाणे फलटण ३०, आसू ४८, होळ ४८, गिरवी २२, आदर्की २५, वाठार निंबाळकर २७, बरड ५१, राजाळे १० आणि तरडगाव ८५ मि. मी. एकूण ३४६ मि. मी. म्हणजे सरासरी ३८.४४ मि. मी. पाऊस झाला आहे.
गतवर्षी दि. २६ जून पर्यंत ४२९ मि. मी., सरासरी ४७.६७ मि. मी. पाऊस झाला होता. त्याचा विचार करता यावर्षी पाऊस कमी झाला आहे.
दरम्यान अगोदर झालेला आणि कालच्या पावसामुळे यावर्षीच्या खरीप पेरण्या समाधानकारक होतील अशी अपेक्षा आहे, बागायती भागात गेल्या सुमारे महिना भरापासून आडसाली ऊसाच्या लागणी सुरु झाल्या आहेत त्या अधिक गतीमान होतील तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्र ऊसाखालील आहे त्यापैकी आडसाली क्षेत्र ८५२५ हेक्टर आहे.
अन्य खरीप पिकांमध्ये सर्वाधिक क्षेत्र बाजरीचे १४८४३ हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत केवळ १००/१५० हेक्टरवर पेरा झाला असला तरी आता बाजरीच्या पेरणीला गती येईल, मका पिकाखालील क्षेत्र ४५०० हेक्टर असते मात्र यावर्षी त्यामध्ये मोठी वाढ अपेक्षीत आहे, आतापर्यंत सुमारे ४५०/५०० हेक्टरवर मका पेरणी झाली असून आता मका पेरणीच्या कामाला गती येईल. भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन ही गळीत धान्ये तसेच कडधान्य व तृण धान्याच्या पेरण्याही टप्प्या टप्प्याने सुरु होतील अशी अपेक्षा आहे.
गुरुवार दि.२५ रोजी रात्री झालेल्या पाऊस, वादळ, वारे यामुळे खुंटे, कांबळेश्वर, जिंती, फडतरवाडी, ठाकुरकी, जावली, राजुरी या गावात सुमारे २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचे शेतकरी, ग्रामस्थांचे राहती घरे, जनावरांचे गोठे, २ शेळ्या दगावल्याने नुकसान झाले असून वीज वितरण कंपनी वीजेचे खांब, वीज वाहक तारा व उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र त्याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.