
स्थैर्य, फलटण, दि. १६ ऑगस्ट : नीरा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित घट झाली आहे. नीरा उजवा कालवा विभागाने आज, दि. १६ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, सर्व प्रमुख धरणांमध्ये एकूण ९३.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणांमध्ये ९८.३२ टक्के पाणीसाठा होता.
आजच्या अहवालानुसार, भाटघर धरण ९८.८५ टक्के (२३.२३ टीएमसी) भरले आहे. तर निरा देवघर धरणात ९४.४६ टक्के (११.०८ टीएमसी) पाणीसाठा आहे. वीर धरणातील पाणीसाठा ८५.२३ टक्क्यांवर (८.०२ टीएमसी) आला असून, गुंजवणी धरणात ७३.९८ टक्के (२.७३ टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे.
निरा देवघर आणि गुंजवणीच्या पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे २८ मिमी आणि १७ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी, पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून, सध्या केवळ कालव्यांद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे.