
दैनिक स्थैर्य । 23 मे 2025। फलटण । फलटण शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सततच्या पावसामुळे दैनंदिन कामकाजासाठी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर विक्री करणार्या विक्रेत्यांची मोठी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे विक्रीसाठी आणलेला माल खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुठेतरी आडोसा शोधून हे विक्रेते मालविक्रीसाठी बसत आहे. रस्त्यावर बसणार्या भाजीविक्रेते, फळविक्रेते यांचीही अशाच प्रकारची अवस्था झाली आहे. पावसामुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्यामुळे मालाला उठाव होत नाही. भाजी नाशिवंत असल्यामुळे पावसाने लवकर खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामध्ये पालेभाज्या जास्त भिजल्या तर जाग्यावरच सडत आहेत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
फलटण सारख्या दुष्काळी भागात पावसाळ्यामध्ये सुध्दा फलटणला एवढा पाऊस पडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची त्रेधातिरपीट उडालेली बघायला मिळत आहे. सध्या पावसाळ्यासारखा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य फलटणकरांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. काही वेळेला दुपारच्या वेळेला काही भागात पाऊस विश्रांती घेत आहे परंतु लगेचच पावसाची संततधार सुरू होत आहे.

