
दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२२ । नागपूर । मुंबईतील रेल्वे नजीकच्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढण्याची शासनाची भूमिका असून, आवश्यकता भासल्यास मुंबईतील सर्व आमदारांची मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक बोलावू आणि या बैठकीला रेल्वे तसेच इतर संबधित यंत्रणांना निमंत्रण देण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.
यासंदर्भात सदस्या श्रीमती मनिषा चौधरी, ॲड. पराग अळवणी यांनी लक्षावेधी उपस्थित केली होती.
श्री. सामंत पुढे म्हणाले, “रेल्वे नजिकच्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात सध्या न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. यासाठी रेल्वे बोर्डाने या विषयावर सहानुभूतीपुर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एम एम आर डी ए आणि रेल्वे बोर्ड यांची एकत्रित बैठक घेऊन सूचना देण्यात येतील” असेही श्री. सामंत यांनी सांगितले.