दैनिक स्थैर्य | दि. २१ जुलै २०२३ | फलटण |
भारत रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स़्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजना आखली आहे. या योजनेखाली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत फलटण स्थानकाचा समावेश यापूर्वीच केला होता. आता रेल्वे बोर्डाने फलटण स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी निधी देण्यास मंजुरी दिली असून लवकरच २० कोटींचा पहिला हप्ता मिळणार आहे. तसे पत्र रेल्वे बोर्डाने दि. ७ जुलै २०२३ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांना पाठविले आहे. त्यामुळे आता काही दिवसांतच आपल्याला फलटण रेल्वे स्थानकाचे आधुनिक रूप पाहावयास मिळेल, अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. रेल्वे बोर्डाने फलटण स्थानकाच्या विकासास मंजुरी दिल्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
आगामी काळामध्ये सुमारे १०० कोटींच्या वर निधी फलटण रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामधील सुमारे २० कोटींचा पहिला हप्ता येत्या काही दिवसात येणार आहे, असेही खा. रणजितसिंह यांनी सांगितले आहे.
माजी खासदार स्व. हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेली फलटणची रेल्वे ही त्यांचे सुपुत्र व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अथक परिश्रम घेत सुरू केली. त्यानंतर आता फलटणवरून फक्त लोणंद न राहता आता पुणे रेल्वेसुध्दा सुरू करण्यात आली आहे. खासदार रणजितसिंह यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आगामी काळामध्ये फलटण-पंढरपूर व फलटण-बारामती रेल्वेसुध्दा पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह यांच्या मागणीनुसार फलटण रेल्वे स्थानकाचा ‘अमृत भारत स्थानक’ योजनेमध्ये समावेश करण्यात आला व आता फलटण स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी देऊन लवकरच त्याचा निधी मिळणार आहे. त्यामुळे काही दिवसातच आपल्याला फलटण रेल्वे स्थानकाचे आधुनिक रूप पाहावयास मिळेल, यात शंका नाही.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत जे जे शब्द दिले होते, त्या शब्दांच्यासहित अतिरिक्त व भरीव अशी विकासकामे खासदार रणजितसिंह यांनी मार्गी लावल्याने फलटणसह माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत.