
स्थैर्य, बारामती, 5 : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी राजरोसपणे सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा टाकला. यात 33 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून 7 दुचाकीसह, एक कार, जुगाराच्या साहित्य असा 9 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माळेगावच्या हद्दीत रमाबाई नगर याठिकाणी बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब चालवणारे रमण गायकवाड यांच्यासह 33 जणांवर कारवाई केली. एका बंगल्यात विनापरवाना पैशांचा जुगार, पत्यांचा क्लब सुरू होता.
पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता रमण गायकवाड यांच्यासह 33 जनावर पोलिसांनी कारवाई करून सात दुचाकी वाहनासह, एक कार टेबल-खुर्च्या, जुगाराचे साहित्य असे नऊ लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपींविरुद्ध बारामती तालुका पोलिस स्टेशनला जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पोलिस हवालदार सुरेश भोई, रमेश केकान, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहुल लांडगे, दत्तात्रय गवळी आदींनी याठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे बेकायदा व्यवहारांना अक्षरश: ऊत आला आहे.