
स्थैर्य, फलटण, दि. १९ नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षाचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी प्रचारात आपली पूर्ण ताकद लावली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्त्वाखाली ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर या प्रभागात सचिन सूर्यवंशी-बेडके यांचे कडवे आव्हान असले तरी, राहुल निंबाळकर यांनी आपली प्रचार यंत्रणा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केली आहे.
राहुल निंबाळकर यांनी आपल्या प्रचारात कोणताही वेळ न घालवता थेट मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. ते केवळ एका गटाचे प्रतिनिधित्व करत नसून, फलटण शहराला नवी दिशा देण्याच्या व्यापक ध्येयासाठी काम करत असल्याची भूमिका मांडत आहेत. मतदारांशी बोलताना ते अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात आपल्याला फलटणला नवी दिशा द्यायची आहे. विकासात पागे पडलेले शहर आपल्याला नवीन उंचीवर न्यायचे आहे.”
विकासाच्या याच मोठ्या प्रवाहात आपला प्रभागही मागे पडता कामा नये, यावर राहुल निंबाळकर विशेष भर देत आहेत. “फलटण शहर विकासाच्या प्रवाहात पुढे जात असताना, आपला प्रभागही या वेगाने पुढे न्यायचा आहे. प्रभागातील मूलभूत सोयी-सुविधा असोत, की तरुणांसाठी रोजगाराचे प्रश्न, आम्ही प्रत्येक समस्येवर काम करण्यासाठी तयार आहोत,” अशी ठाम ग्वाही ते मतदारांना देत आहेत. त्यांच्या या विकासाभिमुख सादेला प्रभागातील सुजाण नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
एकंदरीत, प्रभाग क्रमांक १३ मध्ये राहुल निंबाळकर यांनी आपल्या बाजूने जोरदार हवा केली आहे. एका बाजूला पक्षाच्या बड्या नेत्यांचा भक्कम पाठिंबा आणि दुसऱ्या बाजूला प्रभागात केलेला चांगला जनसंपर्क, यामुळे ही लढत चुरशीची झाली असली तरी, ‘घड्याळा’चा गडी विजयाच्या दिशेने आत्मविश्वासपूर्वक कूच करत आहे. मतदारांनी विकासाच्या या ‘महाप्रवाहात’ त्यांना साथ देऊन फलटणच्या विकासाचा एक भाग व्हावे, असे कळकळीचे आवाहन राहुल निंबाळकर करत आहेत.

