दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । मराठवाड्याच्या लोणी धपाट्याने काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात स्वागत करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. आज (सोमवारी) रात्री नऊ वाजता त्यांचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे.
भारत जोडो यात्रेतील सहभागी मान्यवरांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. या यात्रेच्या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारत जोडो यात्रा ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात असणार आहे. चार मुक्काम जिल्ह्यात मुक्काम असणार आहेत. महाराष्ट्रात प्रवेश केल्यावर राहुल गांधी हे रात्री नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर मशाल हातात घेऊन गुरुनानक जयंती निमित्त राहुल गांधी गुरुद्वारा इथे जाणार आहेत.
९ नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीने तयारीही सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.