
स्थैर्य, फलटण, दि. 15 ऑक्टोबर : राजे गटाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे प्रा. भीमदेव बुरुंगले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फलटणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेशावर थेट भाष्य टाळत फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलेल्या एका व्हॉट्सॲप स्टेटसमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.
ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांच्या पक्षप्रवेशाची बातमी समोर आल्यानंतर काही वेळातच रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर “राजे गटातील सुखा पाटील गेला” असे स्टेटस ठेवले. या स्टेटसमध्ये त्यांनी कोणाचेही नाव थेटपणे घेतलेले नाही. मात्र, बुरुंगले यांच्या पक्षबदलानंतर लगेचच हे स्टेटस ठेवल्याने याचा रोख त्यांच्याकडेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘सुखा पाटील’ हे पात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती ‘सुखा पाटील’ नावाच्या व्यक्तीचे वर्णन करताना म्हणतो की, “सुखा पाटील ३५ भाकर खायचा, बांधभर हगायचा आणि आभाळ हणायचा”. हे वर्णन एखाद्या व्यक्तीची केवळ शक्ती आणि उपभोग घेण्याची वृत्ती दर्शवते. याच पात्राचा संदर्भ रघुनाथराजे यांनी आपल्या स्टेटसमध्ये वापरला आहे.
रघुनाथराजे यांच्या या सूचक टीकेमुळे राजे गटाची या पक्षबदलावरील नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. बुरुंगले यांच्या जाण्याने गटाला काहीही फरक पडणार नाही, उलट एक भार कमी झाल्यासारखेच आहे, असेच त्यांना यातून सुचवायचे असावे, असा अंदाज राजे गटातील जाणकार लावत आहेत. या एकाच वाक्यातील स्टेटसने बुरुंगले यांच्या पक्षप्रवेशावर बोचरी आणि मार्मिक टीका केली आहे.
सोशल मीडियाचा वापर करून करण्यात आलेल्या या राजकीय टीकेमुळे फलटणमधील कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दिवसभर याच विषयावर चर्चा सुरू होती.