दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२४ | फलटण | मुधोजी मनमोहन राजवाडा आणि नाईक निंबाळकर कुटुंबाने नेहमी लोकहिताला प्राधान्य देवून सोशीकतेची भूमिका घेतल्याने नुकसान झाले, त्या पार्श्वभूमीवर कोणाच्या वाळल्या पाचोळयावर पाय देवू नका पण कोणी आगळीक केली तर त्याला माफ करु नका अशी शिकवण माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे यांनी दिल्याची आठवण देत या निवडणुकीत कोणी आडवा आला तर त्याची गय करणार नसल्याचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकराव चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्रीराम मंदिरात करण्यात आला, त्यानंतर मंदिराबाहेर आयोजित सभेत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे, डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हा उपाध्यक्ष संभाजी शिंदे, विकास साळुंखे, ॲड. नरेंद्र तथा राजू भोईटे, पांडुरंग गुंजवटे, शंभूराज खलाटे, सह्याद्री चिमणराव कदम, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, बाळासाहेब खलाटे, आम आदमी पार्टी फलटण तालुका प्रतिनिधी वीरसेन रामदास सोनवणे, शहराध्यक्ष प्रकाश शिंदे, मंगल जाधव, आयाज आतार, शांताराम कारंडे, विश्वासदादा गावडे, शरदराव रणवरे, अनिल रणवरे, शरद रणवरे सर, भोजराज नाईकनिंबाळकर, ॲड. विजय नेवसे, नितीन भोसले, प्रा.भिमदेव बुरुंगले यांच्यासह महाविकास आघाडी मधील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेनंतर मुधोजी मनमोहन राजवाडा ते डी. एड. कॉलेज चौक या मार्गावर मोठे शक्ती प्रदर्शन करीत डी. एड. कॉलेज चौक येथे निवडणूक कार्यालय उद्घाटन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी गाफील राहु नका, प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत काम करा
महाराष्ट्रात सत्ता बदलाची शक्यता निर्माण होताच येथील प्रशासन यंत्रणेत बदल झाला आहे, गत लोकसभा निवडणुकीत या मंडळींनी खूप त्रास दिला असल्याचे नमूद करताना या मतदार संघात आपला विजय निश्चित आहे, तथापि कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गाफील राहु नये, प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत जागरुकतेने काम करा, मोठे मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन करताना लोकांशी सौजन्याने वागा, त्यांना आम्हाला मत का हवे ते समजावून सांगा, लोक आपल्याला मत देण्यास उत्सुक असल्याचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी माजी आमदार दिपकराव चव्हाण, डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संभाजी शिंदे, शंभूराज खलाटे, आय्याज आतार, प्रा.अनिल जगताप, गणेश भोई,विकास साळुंखे यांची भाषणे झाली.
प्रा. भिमदेव बुरुंगले यांनी स्वागत, प्रास्तविक तर प्रा. रणवरे यांनी सूत्र संचालन, समारोप व आभार मानले.