यंदा रब्बी क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित – कृषिमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.६: राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली. राज्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. ही बाब विचारात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश श्री. भुसे यांनी यावेळी दिले.

पुणे येथे झालेल्या या बैठकीमध्ये कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, व्यवस्थापकीय संचालक (महाबीज), कृषि विद्यापीठातील संशोधक व विस्तार संचालक, कृषि विभागाचे सर्व संचालक, सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपस्थित होते.

राज्याचे रब्बी पिकाखालील क्षेत्र सुमारे ५२ लाख हेक्टर आहे. या हंगामात ज्वारी, हरभरा, गहू, मका, कांदा व भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे धरणे, बंधारे भरले आहेत. यामुळे राज्याचे रब्बी हंगामाचे क्षेत्रात वाढ अपेक्षित असून ते ६० लाख हेक्टरपेक्षा असण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी एकूण ९.१४ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून ९.२५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियेाजन करण्यात येत असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

रब्बी हंगामामध्ये गेल्या वर्षी २७.६९ लाख मेट्रिक टन खतांचा वापर झाला होता. यंदा क्षेत्र वाढीचा अंदाज घेऊन ३४.६० लाख मेट्रिक टन खतांची मागणी केंद्र सरकारकडे नोंदविण्यात आली असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

कोकण व पूर्व विदर्भात रब्बी हंगामाचे क्षेत्र कमी आहे. तेथे दुबार पिकाखालील क्षेत्र वाढल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. यासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करणे आवश्यक असून तशा सूचना कृषिमंत्र्यांनी कृषि विद्यापीठांना यावेळी दिल्या. दर्जेदार कलमे रोपे उत्पादनासाठी शासकीय प्रक्षेत्रे व खाजगी रोपवाटिकांना चालना देण्याच्या सूचनाही श्री. भुसे यांनी दिल्या. खरीप हंगामातील पिकांची सद्यस्थिती, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!