महाराष्ट्र स्कूटर्स, मेडीकल कॉलेज, देवस्थान जमीनीसंदर्भातही ना. पवार यांच्याकडे मागणी
स्थैर्य, सातारा, दि. २७ : कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सातारा जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. पुणे आणि मुंबईवरुन असंख्य लोक सातारा जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदविस वाढतच आहे. सातारा शहरातही रुग्ण आढळून येत असून कोव्हीड-१९ (कोरोना) चाचणी करण्यासाठी सातारा आरोग्य विभागाला पुण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर तातडीने सुरु करावे, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी चालू करणे, मेडीकल कॉलेज सुरु करणे आणि देवस्थान इनाम वर्ग ३ असणार्या शेतजमीनीबाबत ही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्याशी चर्चा करुन हे प्रश्न सोडवण्याची मागणी केली. शासकीय विश्रामगृहात ना. पवार यांची आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. यावेळी माजी आ. प्रभाकर घार्गे, मासचे पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून सातारा येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर सुरु करणे अत्यावश्यक आहे. चाचणी सेंटर सुरु झाल्यास त्वरीत चाचणी होवून बाधीत रुग्णांवर तातडीने उपचार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सातारा येथे त्वरीत कोव्हीड-१९ चाचणी सेंटर सुरु करण्यात यावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिहराजे यांनी केली. याबाबत त्वरीत निर्णय घेवू, असे ना. पवार म्हणाले.
सातार्यातील सुमारे ४७ एकर क्षेत्रात असलेला महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक सुक्ष्म व लघू उद्योग बंद पडले आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे. हे सर्व उद्योग सुरु झाल्यास सातार्यातील औद्योगिकरणास चालना मिळणार असून बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधीत उद्योगाशी निगडीत कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बजाज यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही कंपनी सुरु करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
सातारा जिल्ह्यातील सातारा, जावली, महाबळेश्वर तालुक्यातील गावांमधील जमीनी देवस्थान इनाम, दुमाला व रेघेखालील कुळ अशा धारण प्रकार असणार्या आहेत. अशा गावातील शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जापासून वंचीत रहात आहेत. त्यांना बँकेच्या कोणत्याही कर्ज योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच या जमीनी हस्तांतर जमीनी नसल्याने बोजा नोंद करता येत नाही. या शेतकर्यांना पीक कर्ज, मध्यम व दिर्घ मुदत कर्जपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर जमीनीसंदर्भात येणार्या तांत्रिक व कायदेशीर अडचणी दूर कराव्यात. तसेच बहुप्रतिक्षीत शासकीय मेडीकल कॉलेज तातडीने सुरु करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
सर्व मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करुन हे प्रश्न सोडवू, असे आश्वासन ना. अजित पवार यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले.