दैनिक स्थैर्य । दि.१३ फेब्रुवारी २०२१ । फलटण । जुन्या फलटण – सातारा मार्गापैकी बारस्कर चौक ते बाणगंगा नदी पुला पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करुन या भागात निर्माण झालेले धुळीचे साम्राज्य त्वरित दूर करावे अशी मागणी निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी याचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरातील फलटण – सातारा मार्गापैकी बारस्कर चौक ते बाणगंगा नदी पुला पर्यंतच्या या रस्त्यावर तसेच रंगारी महादेव मंदिर ते अवस्थान मंदिर या रस्त्यावर भुयारी गटार योजनेचे काम करण्यासाठी करण्यात आलेल्या खुदाईमुळे संपूर्ण रस्ता उध्वस्त झाला असून त्या रस्त्यावरुन वाहन चालविणे दूर साधे चालणेही मुश्किल झाले आहे. भुयारी गटाराचे ठिकठिकाणी असलेले चेंबर्स रस्त्यापासून वर आले आहेत, तर काही ठिकाणी त्याभोवती असलेले खड्यांमुळे वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
शहराच्या अन्य भागात भुयारी गटारासाठी खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करुन त्याचे डांबरीकरण करण्यात आले, या भागातील सदर रस्ता मात्र पूर्ण दुर्लक्षीत राहिल्याने येथील नागरिकांची या रस्त्यावरुन चालताना किंवा फरांदवाडी, ठाकुरकी, हनुमाननगर, तावडी वगैरे भागात जाणाऱ्या नागरिक, विद्यार्थी, दूध व भाजीपाला विक्रीसाठी शहराकडे येणारे शेतकरी यांची प्रचंड कुचंबना होत असून येथील रहिवाशी सततच्या धुळीमुळे हैराण झाले आहेत.
या भागातील खोदलेले रस्ते त्वरित कारपेट करावेत त्यापूर्वी या रस्त्याची खुदाई करताना फुटलेले पाण्याचे नळ दुरुस्त करावेत अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
याबाबतच्या मागण्याचे फलटण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांचे नावे असलेले निवेदन नुकताच नगर परिषद कार्यालयात शहर अभियंता साठे यांना अजिज शेख, बापू भोजने, स्वप्निल शहा, सिकंदर डांगे यांनी सुपूर्द केले.
आम्ही नागरीक फलटण नगर परिषदेचा कर दरवर्षी भरणा करीत असल्याने नागरीकांना सेवा देणे नगर परिषदेचे कर्तव्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर अजिज शेख, डॉ. वि. रा. त्रिपुटे, शरद पलुसकर, दिपक पोळ, कांचन विकास जाधव, श्रीकांत शेलार, विलास पवार, सादिक शेख, हणमंतराव नलवडे दिलावर सय्यद, पोपटराव काशीद वगैरे २५/३० नागरिकांच्या सह्या आहेत.