डांबरीकरणाच्या कामामुळे सातारा-लोणंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा


स्थैर्य, सातारा, दि.30 ऑक्टोबर : सातारा-लोणंद मार्गावरील वाढेनजीकच्या वेण्णा नदीवरील पुलावरील रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने चुकीची वेळ साधल्याने वाहतूक कोंडी झाली. वाढे फाटा ते पाटखळमाथा या दरम्यान सुमारे 2 किमीवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाढे ते राष्ट्रीय महामार्गादरम्यानच्या सिमेंटचा रस्ता, पाटखळ फाटाही सुमारे एक तास जाम झाला होता. पाच मिनीटांच्या प्रवासासाठी अर्धा तास गेल्यामुळे वाहनधारक, प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

सातारा-लोणंद रस्त्यावरील लोणंद तसेच शिवथर, लिंब, पाटखळमाथ्याकडून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून मगच हे पॅचिंगचे काम करावे, अशी मागणी वाढे व परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

वाढेफाटा हे सातारा, कोरेगाव, फलटण, खंडाळा तालुक्यांसाठी सातारा शहरात येण्यासाठीचे प्रवेशद्वार आहे. सातारा-लोणंद मार्गावर वाहनांची सतत वर्दळ राहते. सध्या शाळांना सुट्ट्या असल्या तरी शिष्यवृत्ती, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे ज्यादा तास सुरु आहेत.
तसेच दिवाळीनंतर सर्व शासकीय कार्यालये सुरु झाली असून चाकरमानी तसेच माहेरवाशिनी गावी परतू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वच मार्गांवर वाहतूक वाढली आहे. अशातच ग्रामीण भागातून सातारा शहरात येण्यासाठी महत्वाचे ठिकाण असलेले वाढे फाटा परिसरात बुधवारी साडे दहाच्या सुमारास वेण्णा पूल परिसरात खड्ड्यांवर पॅचींगच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. कामाच्या शुभारंभालाच वाहनांच्या रांगा लागल्या.

वाढेफाटा ते वाढे ऑईलमिलपर्यंत सुमारे 2 किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कामाच्या वेळेत भर उन्हात तिष्ठत थांबावे लागल्याने वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अंतर्गत रस्तेही पॅक झाल्याने स्थानिकांना रस्ता ओलांडणे अशक्य झाल्याने अनेकांची दैनंदिन कामे खोळंबली होती. सुमारे एक तास वाहनांच्या रांगा लागल्याने स्थानिकांचेदेखील दळणवळण ठप्प झाले होते. वाढे, पाटखळ ग्रामस्थांचे दळणवळण पूर्ण एक तास थांबले होते.


Back to top button
Don`t copy text!