दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.

मागील दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परिक्षेचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर प्रश्नपेढी विकसित करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी व्हावे यासाठी यावर्षी अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच परीक्षेची वेळ वाढवून देण्याचा निर्णयही मंडळामार्फत घेण्यात आला आहे.

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत. या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!