साहित्यिक संवादातून दर्जेदार साहित्य निर्माण करावे – ताराचंद्र आवळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
साहित्यातून समाजमन घडते, यावर अपार निष्ठा ठेवून साहित्यिक प्रामाणिकपणे लिखाण करीत असतो. आपल्या लेखणीने व लिखाणाने अवतीभवती घडणार्‍या घडामोडींवर अचूक व भेदक प्रहार करण्याचे काम साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन केले पाहिजे. आज आपल्या अवतीभवती इतक्या चांगल्या गोष्टी घडतात अन् तितक्याच वाईटही घटना घडतात, त्यामुळे कधीकधी आपलीच मान शरमेने खाली होते. यावर साहित्यिकांनी आज विचार करण्याची वेळ आली आहे. साहित्यिकांनी एकत्र येऊन विचारमंथन केले पाहिजे व त्याचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटले पाहिजे, या उदात्त हेतूने फलटण येथे दर महिन्याला ‘साहित्यिक संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या साहित्यिक संवादातून दर्जेदार साहित्य निर्माण करावे व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे मत संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नाना नानी पार्क फलटण येथे आयोजित अठराव्या साहित्यिक संवाद कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, प्रा. श्रेयस कांबळे, माजी सैनिक हरिदास घनवट, निसर्गप्रेमी सचिन जाधव, अ‍ॅड. शारदा दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, ‘साहित्यिक संवाद’ ही चळवळ आहे. ती अधिक गतिमान करून नवसाहित्यिकांना बळ दिले पाहिजे. दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी साहित्यविषयक अनेक उपक्रम राबविले जातात व यापुढेही राबवण्यात येतील. फलटणकर साहित्यप्रेमी व साहित्यरसिक यांनी यामध्ये आपला अधिक सहभाग नोंदवावा.

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण कार्यवाह अमर शेंडे यांचे डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई यांच्या एसवायबीएच्या अभ्यासक्रमात ‘नामदार जगन्नाथ शंकर शेठ’ हे पुस्तक समाविष्ठ झाले, तसेच ‘फलटणच्या पाऊलखुणा’ हे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल संपादक प्रा. विक्रम आपटे व उदयसिंह पवार तसेच साहित्य सेवेबद्दल महादेव गुंजवटे व पर्यावरणप्रेमी सर्पमित्र मंगेश कर्वे यांचा शाल, पुस्तक व एक रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास रानकवी राहुल निकम, युवा कवी अविनाश चव्हाण, प्रा. सुधीर इंगळे, अ‍ॅड. रोहिणी भंडलकर, अ‍ॅड. बापूसाहेब सरक, अ‍ॅड. ज्ञानेश्वरी चोपडे, महादेव गुंजवटे, प्रा. विक्रम आपटे, अमर शेंडे, मंगेश कर्वे, हरिदास घनवट यांनी आपले साहित्यिक विचार मांडून श्रावणधारा याविषयी कविता सादर केल्या. या महिन्यात वाचलेले पुस्तक व केलेले लिखाण याविषयी आपले विचार मांडले.

प्रास्ताविक व स्वागत प्रा. श्रेयस कांबळे यांनी केले तर आभार अ‍ॅड. वंदना सूळ यांनी मानले. यावेळी फलटण परिसरातील साहित्यप्रेमी, साहित्यिक व नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!