स्थैर्य, फलटण, दि. २९: दत्त फौंडेशनच्या माध्यमातून साखरवाडी, ता. फलटण येथे उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरचे काम उत्तम असून रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वैद्यकीय व अन्य सुविधा उत्तम असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना व्यायाम, प्राणायाम वगैरें सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
दत्त इंडिया फौंडेशन, साखरवाडीच्या माध्यमातून साखर कारखाना परिसरातील रिक्रिएशन क्लब इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरला आज (शनिवार) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली, रुग्णांशी संवाद साधला, त्यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, पोलीस पाटील सौ. सोनलिताई पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता चव्हाण, महसूल मंडलाधिकारी भांगे, तलाठी खराडे उपस्थित होते.
प्रारंभी कारखान्याचे प्रशासनाधिकारी अजित जगताप यांनी स्वागत केल्यानंतर कोरोना केअर सेंटरची क्षमता ६५ बेडची असून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशिनद्वारे आवश्यक असेल त्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. आतापर्यंत १७३ रुग्ण दाखल झाले, त्यापैकी ९३ जण प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित ५२ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच दमा किंवा अन्य आजाराचे २९ रुग्णांना उपचाराची सुविधा दिल्याचे अजित जगताप यांनी सांगितले.