कृषी योजनांच्या माहितीसाठी QR कोडचे अनावरण; तालुका कृषी अधिकारी गायकवाडांचा पुढाकार

डॉ. विठ्ठल विखे पाटील जयंतीनिमित्त कार्यक्रम; विषमुक्त शेती करण्याचे आवाहन


स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : पद्मश्री डॉ. विठ्ठल विखे पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत सहज पोहोचावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या QR कोडचे अनावरण तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शाश्वत शेती, राष्ट्रीय नैसर्गिक शेती, फळबाग लागवड आणि फुलशेती याविषयी मार्गदर्शन केले. तसेच, विषमुक्त अन्नधान्य उत्पादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण फलोत्पादन पुरस्कार प्राप्त शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांच्या फळबागेला प्रशेत्र भेट देण्यात आली.

यावेळी उप कृषी अधिकारी अजित सोनवलकर, सहाय्यक कृषी अधिकारी जाधव, पुरस्कार प्राप्त शेतकरी बबन मुळीक, प्रगतशील शेतकरी नामदेव मुळीक, तुकाराम मुळीक यांच्यासह अनेक शेतकरी व कृषी सखी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव यांनी केले, तर हणमंत मुळीक यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!