पंकजा मुंडेंना धक्का; माजलगाव नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, बीड, दि.१०: भाजपच्या ताब्यात
असलेली माजलगाव नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने माजी मंत्री
पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत
भाजपने सपशेल माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची बिनविरोध
निवड झाली.

भाजप नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बरखास्त
केल्यावर नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने माघार
घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड
झाली. भाजपची सत्ता असलेली नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने
कुतुहलाचा विषय ठरला आहे.

दसरा मेळाव्यात जोरदार भाषण करुन
राजकारणात नव्याने मुसंडी मारण्याचा इशारा दिलेल्या भाजप नेत्या पंकजा
मुंडे यांना बीडमधूनच जबर धक्का मिळाला आहे. माजलगाव नगरपालिका भाजपच्या
ताब्यात होती, मात्र नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
होऊन अटक झाल्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. राष्ट्रवादीचे
आमदार प्रकाश सोळंके यांनी संधी साधत भाजप गटाचे काही नगरसेवक
राष्ट्रवादीच्या तंबूत आणले आणि आपला गड मजबूत केला.

भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर
केला होता, मात्र भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी राष्ट्रवादीसोबत
घरोबा करुन पंकजा मुंडेंनाच मोठा धक्का दिला. मोहन जगताप आघाडीचे 4,
राष्ट्रवादीचे 7, भाजपचा 1 आणि शिवसेनेचे 2 असे 14 संख्याबळ राष्ट्रवादीचे
होते. सहाल चाऊस गटाच्या 4 नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने
एकूण संख्याबळ 18 झाले. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शेख
मंजूर यांचा मार्ग मोकळा झाला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी
मतदारसंघातून मोठ्या मतांनी पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं बीड
जिल्ह्याच्या राजकारणावरील लक्ष कमी झाल्याचं बोललं जात असे. दसरा
मेळाव्यातील पंकजा यांचे भाषण पाहून बीड जिल्ह्यात पुन्हा जोमाने काम सुरु
होईल असं वाटत असतानाच माजलगाव येथील नगरपालिका भाजप नेत्यांनीच
राष्ट्रवादीच्या गोटात नेऊन दिल्याने पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!